ठाणे: भिवंडी येथे एका हाॅटेलमध्ये दारु पिण्याबद्दल बील मागितले असता एकाने वेटरच्या डोक्यात काचेचा ग्लास फोडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
कोनगाव येथे हाॅटेल आहे. या हाॅटेलमध्ये जखमी व्यक्ती वेटर म्हणून काम करतो. तो मूळचा उडीसा राज्यातील आहे. हाॅटेलमधून मिळणाऱ्या वेतनावर त्याचा उदरनिर्वाह चालतो. या हाॅटेलमध्ये शनिवारी किशोर नाईक नावाचा व्यक्ती दारू पिण्यासाठी आला होता. वेटरच्या तो ओळखीचा होता. हाॅटेलमध्ये येताच तो तेथील वातानुकूलीत कक्षामध्ये जाऊन बसला. तिथे त्याने दारू प्यायली.
दरम्यान, त्याचे देयक घेऊन वेटर गेला असता, किशोर नाईक याने ‘कसले बील’ असे म्हणत वेटर सोबत वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने वेटरला शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. तसेच हाताने वेटरला मारहाण करण्यास सुरुवात केली. काही वेळाने किशोर याने टेबलवर ठेवलेला मद्य पिण्याचा काचेचा ग्लास वेटरच्या डोक्यात फोडला.वेटरच्या डोक्यातून रक्तस्त्राव होऊ लागला.
हाॅटेलमधील इतर कर्मचारी वेटरच्या मदतीसाठी धावून आले. त्यानंतर किशोर नाईक हा देयकाची रक्कम न भरता तेथून पळून गेला. जखमी वेटरवर भिवंडीतील आयजीएम या सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याने याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे किशोर नाईक याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११५ (२), ११८ (१), ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.