कल्याण तालुक्यातील टिटवाळ्याजवळील दहागावमध्ये एका नराधमाने एका दोन वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना शुक्रवारी उघडकीला आला आहे. याप्रकरणी मुलीच्या पालकांच्या तक्रारीवरून टिटवाळा पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणाने दहागाव परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
विनयभंग, लैंगिक अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना तात्काळ कठोर शिक्षा होत नसल्याने हे प्रकार वाढत असल्याचा नागरिकांचा सूर आहे.
हे ही वाचा… डोंबिवलीत सागावमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीला मारहाण करणाऱ्या खासगी शिकवणी चालिकेविरुध्द गुन्हा
दहागावमधील एक दोन वर्षाची चिमुकली शुक्रवारी दुपारी आपल्या घराच्या अंगात खेळत होती. त्यावेळी आरोपी नराधम तेथे आला. त्याने मुलीला खाऊ देण्याचे आमिष दाखवून गावा बाहेरील निर्जनस्थळी नेले. तेथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. घडल्या प्रकाराने मुलगी घाबरली. तिला असह्य वेदना सुरू झाल्या. घटनास्थळावरून नराधन पळून गेला. मुलगी रडत घरी आली. अंगणात खेळत असलेली मुलगी का रडते म्हणून तिला काही सरपटणारा साप चावला आहे का, तिच्या अंगाला काही झाले आहे का याची चाचपणी पालकांनी केली. घडल्या प्रकाराबाबत मुलगी काही सांगू शकत नव्हती. नंतर पालकांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाला असल्याचे लक्षात आले. हा प्रकार करणारा इसम पालकांच्या लक्षात येताच त्याच्या नावाने टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली.
पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल केला. दहागाव परिसरातून आरोपीला तात्काळ अटक केली. बदलापूर येथील शाळेत घडलेल्या मुलींवरील अत्याचाराविषयीच्या घटनेविषयी नागरिकांच्या मनात तीव्र रोष आहे. ही धग कायम असताना दहागावमध्ये पुन्हा तसाच प्रकार घडला आहे.