डोंबिवली - येथील पश्चिमेतील रस्त्यांवर मद्यपान करून इनोव्हा मोटार चालविणाऱ्या एका वाहन चालकाने विविध रस्त्यांवर मोटार नेऊन एकूण १२ वाहनांना धडका दिल्या. यामध्ये १० जण जखमी झाले आहेत. मद्यधुंद मोटार चालकाला इतर नागरिकांनी पकडून त्याला विष्णुनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. काल रात्री हा प्रकार घडला. विष्णुनगर पोलिसांनी मोटार चालकाविरुद्ध मद्यपान करून वाहन चालविल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. एक मोटार कारचालक काल रात्री नवापाडा, महाराष्ट्रनगर, उमेशनगर या भागातील रस्त्यावरून वाहन चालवित होता. त्याचे वाहनावरील नियंत्रण दारू पिण्याने सुटत असल्याने तो समोरून येणाऱ्या रिक्षा, दुचाकी, मोटारीला, पादचाऱ्यांना धडक देऊन पुढे जात होता. या चालकामुळे एखाद्या पादचाऱ्याचा मृत्यू होण्याची भीती होती. इतर वाहनांचा वाहन चालक, पादचारी यांनी एकत्रितपणे मोटार चालकाची मोटार थांबविण्यात यश मिळविले. त्याला चांगला चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले. हेही वाचा - डोंबिवली, कल्याणमधील बेकायदा बांधकामांच्या विरुद्ध ९०० दिवसांपासून उपोषण, भीक मागो आंदोलनातून अधिकाऱ्यांसाठी पैशाचे संकलन मोटारीच्या धडकेमुळे अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. धडक देणाऱ्या वाहनाचा पुढील भाग तुटला आहे. मोटार वाहन कायद्याने पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.