डोंबिवली : शिळफाटा रस्त्यावरील प्रीमिअर कंपनीच्या मैदानावर येत्या रविवारी (ता. २५) तिरुपती बालाजीचा महोत्सव आयोजित केला आहे. सकाळी साडे सहा ते रात्री उशिरापर्यंत विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम याठिकाणी होणार आहेत. ज्या भाविकांना तिरूपती येथे जाऊन बालाजीचे दर्शन घेणे शक्य होत नाही, त्यांना स्थानिक पातळीवर दर्शनाची संधी उपलब्ध करून देणे, हाही या कार्यक्रमाचा उद्देश आहे. लाखो लोक यानिमित्ताने दर्शनासाठी येतील, अशी माहिती या कार्यक्रमाचे एक संयोजक खासदार डाॅक्टर श्रीकांत शिंदे यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

तिरुमाला तिरूपती देवस्थान आणि डाॅक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनतर्फे यांच्यातर्फे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आले आहे. तिरुपती देवस्थानच्या मार्गदर्शनाखाली येथील सर्व धार्मिक विधी, इतर कार्यक्रम पार पडणार आहेत. रविवारी सकाळी साडे सहा वाजता बालाजीच्या धार्मिक विधींना सुरूवात होईल. एक हजार आठ दाम्पत्ये कुंंकुमार्चन सोहळ्यात सहभागी होतील. अभिषेक सोहळा यावेळी पार पडेल. तिरुपती मंदिरातील पूजारी येथे यथासांग पूर्जाअर्चा करणार आहेत. प्रसादाचे लाडू तिरुपती येथील आचारीच येथे तयार करणार आहेत. बालाजीच्या रथयात्रेसाठी तिरुपतीहून खास रथ मागविण्यात आला आहे. सागर्ली येथील बालाजी मंदिरापासून दुपारी तीन वाजता रथयात्रेला प्रारंभ होईल.

हेही वाचा : कल्याण डोंबिवली पालिका शिक्षण विभागात लिपिकाची मनमानी, शालेय पोषण आहार पुरवठा करणाऱ्या ११ महिला संस्थांची तक्रार

रथयात्रेत मुंबई, ठाणे, रायगड, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई भागातील दाक्षिणात्य, स्थानिक मराठी मंडळी लाखोच्या संख्येने सहभागी होणार आहेत. संध्याकाळच्या वेळेत बालाजीचा विवाह सोहळा पार पडणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा : तळोजा कारागृहात शिक्षा भोगत असलेला कल्याणमधील कैदी फरार, बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

दीड ते दोन लाख भाविकांच्या भोजन आणि तेवढ्याच लाडूच्या प्रसादाची व्यवस्था महोत्सवात करण्यात आली आहे. अनेक सांस्कृतिक कार्यक्रम महोत्सवाच्या निमित्ताने होणार आहेत. महोत्सव परिसरात विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. तिरुपती येथे बालाजी मंदिरात होत असलेल्या पूजेप्रमाणे याठिकाणी पूजाअर्चा करण्याची संधी भाविकांना उपलब्ध होणार आहे. ज्या भाविकांना या महोत्सवात सहभागी व्हायचे आहे त्यांनी ७८७५५६७६५७ येथे संपर्क करावा. विविध स्तरातील भाविकांनी या महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांंनी केले आहे.