डोंबिवली, कल्याणमध्ये पेव्हर ब्लॉकने खड्डे बुजविण्यास सुरुवात | In Dombivli Kalyan pothole filling with paver blocks amy 95 | Loksatta

डोंबिवली, कल्याणमध्ये पेव्हर ब्लॉकने खड्डे बुजविण्यास सुरुवात

मे अखेरपर्यंत रस्ते सुस्थितीत ठेवणे कल्याण डोंबिवली पालिकेला जमले नाही.

डोंबिवली, कल्याणमध्ये पेव्हर ब्लॉकने खड्डे बुजविण्यास सुरुवात
( डोंबिवली, कल्याणमध्ये पेव्हर ब्लॉकने खड्डे बुजविण्यास सुरुवात )

कल्याण- मे अखेरपर्यंत रस्ते सुस्थितीत ठेवणे कल्याण डोंबिवली पालिकेला जमले नाही. मुसळधार पाऊस सुरू झाल्यानंतर या खराब रस्त्यांवर खड्डे पडून रस्त्यांची गेल्या महिनाभरात चाळण झाली. खड्ड्यांवरून नागरिकांनी प्रशासनाला टिकेचे लक्ष्य केल्याने नागरिकांच्या समाधानासाठी खडी, पेव्हर ब्लाॅक खड्ड्यांमध्ये टाकून खड्डे भरणीची कामे प्रशासनाने सुरू केली आहेत.

पेव्हर ब्लाॅकमुळे खड्ड्याचा आकार वाढत नाही आणि वाहने जोराने खड्ड्यात आपटत नाहीत. त्यामुळे तात्पुरता उपाय म्हणून या उपाय योजना केल्या आहेत, अशी माहिती बांधकाम विभागाच्या अभियंत्याने दिली. पदपथांवर बसविण्यासाठी आणलेले पेव्हर ब्लाॅक खड्डे कामासाठी वापरले जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खड्ड्यांमुळे एकही जीव जाता कामा नये असे कठोर आदेश जिल्हा, पालिका प्रशासनाला दिले आहेत. खड्ड्यांमुळे काही दुर्घटना घडली तर संबंधितांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जिल्हा महसूल, पालिका यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत.
कल्याण डोंबिवली पालिकेने खड्डे भरणीच्या कामासाठी १५ कोटीच्या निधीची तरतूद केली आहे. या निधीतील सुमारे सहा कोटीची कामे मे अखेरपर्यंत करणे आवश्यक होते. उर्वरित निधीतील कामे पावसाळ्याच्या चार महिन्यात करणे आवश्यक होते.

परंतु, शहर अभियंता विभागाने मे अखेरपर्यंत खड्डे भरण्याच्या कामाच्या निविदा प्रक्रियाच पूर्ण केल्या नाहीत. मुसळधार पाऊस सुरू झाल्यानंतर मार्च ते एप्रिलमध्ये रस्त्यांवर पडलेले खड्डे मुसळधार पाऊस सुरू होताच सततच्या वाहन वर्दळीमुळे मोठ्या आकाराचे झाले. या खड्ड्यांमुळे शहरात, मुख्य रस्त्यांवर वाहन कोंडी होऊ लागली. प्रवाशांकडून टिका होऊ लागताच खडबडून जागे झालेल्या आयुक्त, शहर अभियंता विभागाने जूनमध्ये खड्डे भरण्यांच्या कामाच्या निविदा प्रक्रिया सुरू केल्या. या प्रक्रिया मार्च, एप्रिलमध्ये पूर्ण होणे आवश्यक होते. शहर अभियंता विभाग सुस्तावल्याने कोणीही अधिकाऱ्याने या महत्वपूर्ण विषयाकडे लक्ष दिले नाही. त्याचे चटके आता खड्ड्यांच्या माध्यमातून प्रवाशांना बसत आहेत.

मुसळधार पाऊस सुरू झाल्यानंतर दहा प्रभाग हद्दीतील खड्डे भरणीची कामे १० ठेकेदारांना दिली आहेत. हे ठेकेदार खडी, मातीचा गिलावा खड्ड्यांमध्ये टाकून तात्पुरे खड्डे बुजविण्याची कामे करत आहेत. या खड्डे भरणीमुळे वाहनांच्या टायरमुळे खडी बाहेर येऊन दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. रिक्षा चालक खडीमुळे टायर खराब होत असल्याने हैराण आहेत.

पेव्हर ब्लाॅक बसवून खड्डे भरणीची कामे करण्यात येत असली तरी पेव्हर ब्लाॅकवर सतत वाहन आपटून त्या रस्त्याखाली आणखी मोठा खड्डा तयार होण्याची भीती रस्ते बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली. मुंबई, ठाणे, नवी मुंबई इतर कोणत्याही पालिकेत खड्ड्यांच्या तक्रारी नसताना दरवर्षी कल्याण डोंबिवली पालिकेतच खड्डयांचा विषय गाजत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ठरावीक ठेकेदार, ठरावीक अभियंते आणि कामे मंजूर करणारे ठरावीक अधिकारी या पालिकेतील साखळीमुळे पालिका हद्दीतील विकास कामांची वाताहत झाली आहे, अशी माहिती पालिकेतील काही उच्चपदस्थ खासगीत देतात.

नवनियुक्त आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे खड्डे भरणीचा विषय कसा हाताळतात. खड्डे भरणीबद्दल निष्क्रियता दाखविणाऱ्या शहर अभियंता विभागावर काय कारवाई करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. रस्ते, खड्डे विषय अंगलट येण्याची शक्यता असल्याने बांधकाम विभागातील एका वरिष्ठ अधिकारी लवकरच रजेवर जाण्याची तयारी करत असल्याचे कळते.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-07-2022 at 13:26 IST
Next Story
कल्याण-अहमदनगर महामार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी