डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा येथील खाडी किनारी जेट्टी असलेल्या ठिकाणी ग्रामस्थांनी खारफुटीची आठ ते नऊ जुनाट झाडे मुळासकट तोडून टाकली आहेत. देवीचापाडा येथे गणपती विसर्जन करण्यासाठी येणाऱ्या भाविकांना दूरवरून गणपतीचे दर्शन व्हावे म्हणून ग्रामस्थांकडून खारफुटीवर कुऱ्हाड चालविण्यात आली आहे, अशा तक्रारी पर्यावरणप्रेमींनी केल्या आहेत.
या प्रकाराबद्दल पर्यावरणप्रेमी नागरिक, निसर्गप्रेमी छायाचित्रकार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शासन खारफुटी संवर्धनासाठी प्रयत्नशील आहे. खारफुटीची विशेष जंगले घोषित करण्याचे नियोजन केले जात आहे. कल्याण-डोंबिवली परिसरातील खारफुटीचे राखीव जंगल घोषित करण्याचे प्रयत्न शासनस्तरावरुन केले जात आहेत. अशा परिस्थितीत किरकोळ कारणावरुन देवीचापाडा येथे खारफुटीची झाडे तोडण्यात आली आहेत. ही झाडे तोडणाऱ्यांची माहिती घेऊन महसूल अधिकाऱ्यांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींकडून केली जात आहे.
हेही वाचा : “कल्याण लोकसभेची वाटचाल भाजपा उमेदवाराच्या दिशेने”, मनसे आमदार राजू पाटलांचं सूचक वक्तव्य
ग्रामस्थांची पूर्वसूचना
देवीचापाडा खाडी किनारी खाडीत जाण्यासाठी १५० फुटाची उतार पायवाट (जेट्टी) आहे. उतार पायवाटेवरुन खाडीत गणपती विसर्जन केले जाते. विसर्जनाच्या दोन दिवस अगोदर देवीचापाडा येथील काही स्थानिक ग्रामस्थांनी पर्यावरण दक्षता मंडळाच्या डोंबिवली विभागाच्या प्रमुख रुपाली शाईवाले यांची खाडी किनारी भेट घेतली. आम्हाला गणपती विसर्जनापूर्वी जेट्टीच्या बाजुची खारफुटीची झाडे तोडायची आहेत, अशी मागणी केली. विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांना दूरवरुन विसर्जन पाहता यावे, हा ग्रामस्थांचा उद्देश होता.
हेही वाचा : “भारत, इंडिया, हिंदुस्तान, काय जातंय ३ नावं घ्यायला?” राज ठाकरे यांची फटकेबाजी
विसर्जनासाठी खारफुटीची झाडे तोडू नका. विसर्जनासाठी भाविक जेट्टीवरुन खाडीच्या दिशेने जातात, अशी सूचना शाईवाले यांनी ग्रामस्थांना केली. तुम्हाला झाडे तोडायची असतील तर तुम्ही जिल्हाधिकारी यांची परवानगी आणा. त्यानंतर झाडांच्याबाबतीत योग्य निर्णय घ्या, अशी सूचना केली. परवानगीची गरजच काय. आम्ही झाडे तोडली तर कोण आम्हाला काय करणार, असे उलट प्रश्न स्थानिक ग्रामस्थांनी शाईवाले यांना केले. काही ग्रामस्थांनी शाईवाले यांचे मोबाईलमधून चित्रण केले. ग्रामस्थ ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने शाईवाले खाडी किनाऱ्यावरुन परतल्या.
हेही वाचा : गढूळ झालेल्या राजकीय वातावरण साहित्यिकांनी व्यक्त व्हावे; राज ठाकरे
शनिवारी गौरी-गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर रविवारी खाडी किनारचे निर्माल्य, इतर कचरा उचलण्यासाठीचे नियोजन करण्यासाठी रुपाली शाईवाले देवीचापाडा खाडीकिनारी गेल्या. तेव्हा त्यांना जेट्टी जवळील जुनाट खारफुटीची आठ ते नऊ झाडे मुळासकट तोडली असल्याचे दिसले. दरवर्षी खाडी किनारी पर्यावरण दक्षता मंडळातर्फे जागतिक कांदळवन दिनानिमित्त खारफुटीच्या विविध जातीच्या रोपांची लागवड केली जाते. त्याउलट ग्रामस्थ दरवर्षी विसर्जन काळात खाडी किनारची झाडे तोडत आहेत.
हेही वाचा : मनसे पदाधिकारी जमील शेख यांच्या हत्येप्रकरणात आणखी एकाला अटक
यावेळी भाविकांना विसर्जनासाठी जेट्टीवरुन थेट खाडीमध्ये गणपतीचे विसर्जन करता यावे म्हणून जेट्टी जवळ तराफ्याची सोय करण्यात आली होती. खारफुटीची झाडे तोडून ग्रामस्थांनी साधले काय, असा प्रश्न पर्यावरणप्रेमी नागरिक उपस्थित करत आहेत. “गणपती विसर्जनाच्या दोन दिवस अगोदर दरवर्षी देवीचापाडा जेट्टी जवळील खाडी किनारची जुनाट खारफुटीची झाडे तोडली जातात. हे चुकीचे आहे. महसूल, कांदळवन संरक्षण अधिकाऱ्यांनी या विषयीची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे.”, असे पर्यावरण दक्षता मंडळ, डोंबिवली विभागाच्या प्रमुख रुपाली शाईवाले यांनी म्हटले आहे.
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In dombivli west villagers at devichapada cuts down mangrove trees in large numbers for ganesh visarjan 2023 css