डोंबिवली: आता आपण मुंबई महापालिकेतून निवृत्त झालो आहोत. नोकरीच्या काळात कोठेही जाता आले नाही. आता निवृत्तीनंतर दुबईत फिरून येऊ, अशी स्वप्ने पाहणाऱ्या कुटुंबीयांवर रविवारी मोठा आघात झाला. या घरातील महिला डोंबिवली पश्चिमेतील सम्राट चौकाजवळ डम्परच्या धडकेत मरण पावली. कर्ता पुरूष जखमी झाला. या कुटुंबीयांच्या विदेशी जाण्याच्या आनंदावर घरातील कर्ती महिला गेल्याने विरजण पडले आहे.

स्नेहा सुधीर दाभिलकर (५२) असे डम्पर खाली मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे. त्यांचे पती सुधीर हे नुकतेच मुंबई महानगर पालिकेतून अग्निशमन विभागातून निवृत्त झाले होते. दाभिलकर दाम्पत्याला दोन मुले आहेत. ते डोंबिवली पश्चिमेत राहत होते. सुधीर हे नुकतेच मुंबई महापालिकेतून निवृत्त झाले आहेत. नोकरीच्या काळात कुटुंंबीयांना घेऊन कोठेही पर्यटनासाठी जाता न आल्याने यावेळी दाभिलकर कुटु्ंबीयांना दुबईला जाण्याचा निर्णय घेतला होता.

हेही वाचा: मेगा ब्लॉक संपल्यानंतरही प्रवाशांचे हाल कायम, रेल्वे गाड्यांची वाहतूक २० ते २५ मिनिटे उशिराने

दुबईला जाण्यासाठी पारपत्रची प्रक्रिया पार पाडण्यासाठी सुधीर आणि मयत स्नेहा दाभिलकर हे रविवारी दुपारी डोंबिवली पूर्वेतील एमआयडीसी कार्यालयात पारपत्र कामासाठी गेले होते. दुपारी तेथून परतत असताना पंडित दिनदयाळ रस्त्याने येत असताना या रस्त्याच्या अरुंद रस्त्यावर समोरून मोठा मालवाहू डम्पर आला. रस्त्याच्या दुतर्फा चारचाकी वाहने आणि समोरून डम्पर येतोय म्हणून सुधीर यांनी आपली दुचाकी थोडी हळू करून बाजुला घेण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात त्यांना डम्परची धडक बसली. दुचाकीच्या पाठीमागे बसलेली पत्नी स्नेहा डम्परच्या चाकाखाली येऊन जागीच मरण पावली.

हेही वाचा: मुरबाडचे भाजप आमदार किसन कथोरे यांची भाजपमधून हकालपट्टी करा, भाजप नेते जगन्नाथ पाटील यांची प्रदेशाध्यक्षांकडे मागणी

गंभीर जखमी स्नेहा यांना तातडीने पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांना डाॅक्टरांनी मृत घोषित केले. विष्णुनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. डम्पर चालकाला अटक केली. या घटनेने दाभिलकर कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. माणकोली पुलावरून धावणाऱ्या वाहनांची संंख्या वाढली आहे. त्यामुळे दिनदयाळ रस्त्यावरील वाहन संख्या वाढली आहे. वाढत्या वाहनांच्या तुलनेत दिनदयाळ रोड वाहनांसाठी अपुरा पडत आहे. त्यामधून ही दुर्घटना घडल्याचे स्थानिक व्यापाऱी, रहिवाशांनी सांगितले.