कल्याण – माझ्या मनासारखे भोजन का करत नाहीस. मला जे आवडत नाही ते जेवण करून तू मला का त्रास देतेस, असे प्रश्न करून संतप्त झालेल्या कल्याणमधील सिंधीगेट भागात राहत असलेल्या पतीने आपल्या पत्नीच्या डोक्यात कढई मारून तिला गंभीर जखमी केले आहे. मंगळवारी रात्री हा प्रकार घडला आहे.

निलोफर युसुफ मेवेगार (३४) असे जखमी पत्नीचे नाव आहे. निलोफर आणि युसुफ हे पती, पत्नी कल्याण पश्चिमेतील मुरबाड रस्त्यावरील सिंधीगेट भागातील कुरबान हुसेन चाळीत राहतात. आवडीच्या जेवणावरून युसुफ नेहमीच पत्नीला जाब विचारायचा. मंगळवारी रात्री युसुफ घरात जेवायला बसला होता. त्यावेळी पत्नीने त्याच्या समोर भोजनाचे ताट आणून ठेवले. भोजनाचे ताट बघून युसुफ संतप्त झाला. त्याने मला जे भोजन आवडते ते तू का करत नाहीस. न आवडणारे जेवण करून तू मला का त्रास देतेस असे प्रश्न करून युसुफने पत्नी निलोफर हिच्या बरोबर वाद घातला.

हेही वाचा – डोंबिवली, कल्याणमध्ये ऑनलाईन गुंतवणुकीतून सव्वा कोटीची फसवणूक

हेही वाचा – लाडकी बहीण’ योजनेत सत्ताधारी आमदारांचीच वर्णी

निलोफरने समंजस भूमिका घेऊन युसुफला शांत राहण्यास सांगितले. पण त्यामुळे युसुफ अधिक संतप्त झाला. त्याने रागाच्या भरात घरात स्वयंपाक खोलीतून कढई आणली आणि ती कढई पत्नी निलोफरच्या डोक्यात जोराने मारली. वर्मी फटका बसल्याने निलोफर गंभीर जखमी झाली. तिने तात्काळ महात्मा फुले पोलीस ठाण्यात जाऊन पती युसुफ विरुद्ध तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हवालदार के. पी. शिंदे तपास करत आहेत.