कल्याण : कल्याण पूर्वेतील दावडी गावात महापालिकेच्या विकास आराखड्यामधील रस्त्यामध्ये उभारण्यात आलेली एक चार माळ्याची बेकायदा इमारत भुईसपाट करण्याची कारवाई आय प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी मंगळवारपासून सुरू केली आहे.

या इमारतीवर आत्ताच कारवाई केली नाहीतर माफिया ही इमारत सात माळ्याची करून तिचा निवासी वापर सुरू करू शकतात. त्यामुळे ही इमारत पाऊस सुरू असला तरी भुईसपाट करण्याचे काम सुरू केले आहे, अशी माहिती आय प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी दिली. दावडीतून पालिकेचा विकास आराखड्यातील रस्ता गेला आहे हे माहिती असूनही भूमाफिया शेजूळ यांनी दावडी येथे चार माळ्याची बेकायदा इमारत उभी केली.

हेही वाचा…वाहतूक कोंडीमुळे डोंबिवलीतल्या विद्यानिकेतन शाळेला दुपारच्या सत्रात सुट्टी, राजू पाटील म्हणाले, “ही बाब लज्जास्पद”

शेजूळ यांनी विकास आराखड्यात बेकायदा इमारत उभारली असल्याच्या तक्रारी आय प्रभागाच्या साहाय्य्क आयुक्त मुंबरकर यांच्याकडे आल्या होत्या. मुंबरकर यांनी आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड, उपायुक्त अवधूत तावडे, उपायुक्त रमेश मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली माफिया शेजूळ यांना इमारतीची बांधकाम परवानगीची कागदपत्रे सादर करण्याची नोटिस बजावली. विहित मुदतीत ते कागदपत्रे सादर करू शकले नाहीत. साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी शेजूळ यांची इमारत अनधिकृत असल्याचे घोषित केले. या बेकायदा इमारतीमधून घर खरेदीदारांची फसवणूक टाळण्यासाठी साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी भर पावसात ही इमारत भुईसपाट करण्याचे काम मंगळवारपासून सुरू केले आहे.

या इमारतीचे स्लॅब क्रॅकरने तोडल्यानंतर या इमारतीचे सिमेंटचे खांब पोकलेनच्या साहाय्याने तोडण्याचे काम बुधवारपासून सुरू करण्यात आले. या कारवाईने दावडी भागातील भूमाफियांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. आय प्रभागात गेल्या वर्षभरात भुईसपाट करण्यात येणारी ही सहावी बेकायदा इमारत आहे.

हेही वाचा…ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर बांबूचे छत, पावसापासून बचाव करण्यासाठी तात्पुरता आडोसा

दावडी गावात विकास आराखड्यातील रस्त्यामध्ये बेकायदा इमारत उभारल्याच्या तक्रारी आल्या होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने आयुक्त, उपायुक्तांच्या आदेशाने ही इमारत जमीनदोस्त केली जात आहे. – हेमा मुंबरकर, साहाय्यक आयुक्त, आय प्रभाग, कल्याण.