कल्याण – गेल्या पंधरा दिवसाच्या कालावधीत कल्याणमधील एस. टी. बस आगारात पाच ते सहा प्रवाशांना चोरट्यांनी बसमध्ये चढताना लुटले आहे. प्रवासी घाईगर्दीत बसमध्ये चढत असेल तर त्याच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज लुटण्याकडे या चोरट्यांचा कल आहे. चोरट्यांचा एस. टी. बस आगारात वाढता वावर असुनही आगार प्रशासनाकडून यासंदर्भात प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही ठोस कारवाई केली जात नसल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजीचा सूर आहे.

धाराशिव जिल्ह्यात वाशीम तालुक्यात राहणारे औषध विक्रेते राहुल गायकवाड (३०) हे काही कामानिमित्त कल्याणमध्ये आले होते. ते पुन्हा आपल्या गावी जाण्यासाठी कल्याण पश्चिमेतील नवीन एस. टी. बस आगारात शनिवारी सकाळी साडे सात वाजता आले होते. ते धारशिव जिल्ह्यातील भूम येथे जाणाऱ्या बसमध्ये सकाळच्या वेळेत चढत असताना त्यांच्या गळ्यातील २० ग्रॅम वजनाची ७० हजार रूपये किमतीची सोन्याची साखळी सराईत चोरट्याने हातोहात लांबवली. आणि चोरटा पळून गेला. बसमध्ये चढण्यापूर्वी दोन इसम त्यांच्या भोवती फिरत होते.

बसमध्ये चढल्यानंतर राहुल गायकवाड यांचा हात गळ्याच्या दिशेने गेला. त्यांना गळ्यात सोनसाखळी नसल्याचे दिसले. त्यांनी बसमधील मार्गिकेत, बस खाली उतरून पायऱ्यांजवळ तपासणी केली. त्यांना कोठेही सोनसाखळी आढळून आली नाही.

चोरट्यांनीच ही सोनसाखळी चोरली असल्याचा संशय घेत राहुल गायकवाड यांनी दोन अज्ञात इसमांविरुध्द महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी गु्न्हा दाखल करून घेतला आहे. पोलीस उपनिरीक्षक जानू पवार याप्रकरणाचा तपास करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरवर्षी सुट्टीचा हंगाम असला की चोरट्यांचा एप्रिल ते मे या कालावधीत कल्याण एस. टी. बस आगारात वावर असतो. प्रवासी म्हणून हे चोरटे बस आगारात येतात आणि चोऱ्या करून पळून जातात, असे प्रवाशांनी सांगितले.