लोकसत्ता खास प्रतिनिधी कल्याण : एक चौदा वर्षाचा गतिमंद मुलगा चार दिवस आपल्या आईच्या मृतदेहाजवळ बसून होता. घरातून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर शेजाऱ्यांनी घराचा दरवाजा उघडला. त्यावेळी मुलाची आई मृत झाली होती. आणि तिच्या मृतदेहाजवळ गतिमंद मुलगा बसून होता, असे दृश्य शेजाऱ्यांना पाहण्यास मिळाले. मन हेलावून टाकणाऱ्या या घटनेने खळबळ उडाली आहे. कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा भागातील एका उच्चभ्रू वस्तीमधील गृहसंकुलात बुधवारी हा प्रकार उघडकीला आला आहे. सिल्व्हिया डॅनिअल (४४) असे मृत महिलेचे नाव आहे. आल्विन डॅनिअल असे गतिमंद मुलाचे नाव आहे. खडकपाडा पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्युची नोंद करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या महिलेचा मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठविला आहे. या महिलेचा पती पुणे येथे नोकरी करतो असे शेजाऱ्यांनी सांगितले. आणखी वाचा-चोरीसाठी विमानानं मुंबईत यायचा, ड्रेनेजच्या पाईपात राहायचा आणि चोरीनंतर पुन्हा विमानानंच पसार व्हायचा! पोलिसांनी सांगितले, डॅनिअल यांच्या शेजाऱ्यांना बुधवारी घर परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरल्याने त्रास होऊ लागला. ही दुर्गंधी कोठून येते याचा तपास शेजारी करू लागले. त्यावेळी संकुलाचा रखवालदार आणि शेजाऱ्यांनी डॅनिअल यांचा दरवाजा खूप वेळ ठोठावला. अल्विन याने दरवाजा उघडताच दुर्गंधी येऊ लागली. शेजारी डॅनिअल यांच्या घरात जाताच त्यांना सिल्व्हिया या मृत अवस्थेत आणि त्यांचा मृतदेह सडला असल्याचे दिसले. शेजाऱ्यांनी ही माहिती तात्काळ खडकपाडा पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गतिमंद मुलाला बोलते केले.त्याने आई खूप आजारी होती. त्या आजारातून मृत्यू झाल्याचे आणि यात संशय घेण्यास वाव नसल्याचे पोलिसांना सांगितले. शवविच्छेदन अहवालातून हा प्रकार कशामुळे घडला हे स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.