कल्याण: हुंड्यासाठी सुनेचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी टिटवाळा पोलिसांनी सासू, सासरे, दीर, भावजय आणि पती यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सासरच्या मंडळींकडून सुनेचा माहेरहून २० लाख रूपये आण, लग्नात मानपान केला नाही अशा कारणांवरून तिला छळले जात होते. आरती केतन भांगरे (२५) असे मयत विवाहितेचे नाव आहे. टिटवाळा येथील हरी ओम व्हॅली फेज दोन इमारतीत ती सासरच्या मंडळींसोबत राहत होती. पोलिसांनी सासरा दिनकर काशिनाथ भांगरे, सासू लतिका दिनकर भांगरे, नवरा केतन, दीर गुंजन, जाव मनीषा गुंजन भांगरे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील एकदरा गावाताली मूळ रहिवासी आहेत. विवाहितेचा भाऊ जनार्दन घारे यांनी याप्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. घारे कुटुंब हे इगतपुरी जवळील काळुस्ते गावी राहते. हेही वाचा : “मी कधी-कधी विसरतो मी राष्ट्रवादीत आहे, मी शिवसेनेत असल्यासारखाचं वागतो”, शरद पवारांच्या खासदाराचे वक्तव्य पोलिसांनी सांगितले, गेल्या वर्षी आरतीचा विवाह केतन याच्या बरोबर झाला होता. आरती ही मूळची नाशिक भागातील आहे. विवाहानंतर काही दिवसांनी सासरच्या मंडळींनी आरतीला टोमणे मारण्यास सुरूवात केली होती. विवाहात आमचा मानपान केला नाही. नवीन घरासाठी माहेरहून २० लाख रूपये आण. तुला चांगला स्वयंपाक करता येत नाही, अशाप्रकारे आरतीला दररोज त्रास दिला जात होता. या छळाला आरती कंटाळली होती. माहेरी हा प्रकार तिने सांगितला होता. हेही वाचा : कल्याणमध्ये आयडियल शाळेतील विद्यार्थ्याची शिक्षिकेच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या दिवसेंदिवस त्रास वाढू लागल्याने आरतीने शनिवारी रात्री टिटवाळा येथील सासरच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. टिटवाळा पोलिसांना ही माहिती मिळताच, त्यांनी घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेतला. आरतीच्या भावाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल होताच पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली. त्यांना कल्याण जिल्हा न्यायालयात पोलिसांनी हजर केले. न्यायालयाने त्यांना मंगळवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.