डोंबिवली – डोंंबिवली पश्चिमेतील कुंभारखाणपाडा येथे एका इमारतीच्या पाचव्या माळ्यावरील रिफ्युजी जागेत रात्रीच्या वेळेत शतपावली करत असताना एका ७० वर्षाच्या वृध्दाला चक्कर आली. त्यांचा तोल जाऊन ते इमारतीखालील दुकानाच्या गाळ्यांवरील पत्र्याच्या निवाऱ्यावर पडले. त्यांना तातडीने कल्याण डोंबिवली पालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात नेण्यात आले. पण तेथे डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

रामचंद्र महादेव पवार (७०) असे मरण पावलेल्या वृध्दाचे नाव आहे. डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखाणपाडा येथील नाना विष्णू हाईट्स या इमारतीत ही दुर्घटना घडली आहे. मयत रामचंद्र पवार यांच्या स्नुषा पूनम महेंद्र पवार यांनी यासंदर्भात विष्णुनगर पोलीस ठाण्यात माहिती दिली आहे. या माहितीवरून पोलिसांनी अकस्मिक मृत्युची नोंद केली आहे.

गेल्या काही दिवसापूर्वीच डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा येथील सत्यवान चौकात एका वृध्दाचा मध्यरात्रीच्या सुमारास लघुशंकेसाठी उठल्यानंतर झोपेच्या तंद्रीत असल्याने इमारतीच्या उदवहनाच्या हौद्यात पडून मृत्यू झाला होता. या घटनेचा पोलीस तपास सुरू असताना आता ही दुर्घटना घडली आहे.

पोलीस ठाण्यातील तक्रारीतील माहिती अशी की, मयत रामचंद्र महादेव पवार यांना दररोज रात्री भोजन झाल्यावर १५ ते २० मिनिटे चालण्याची सवय होती. त्यामुळे नित्यनेमाने ते रात्रीचे भोजन झाले की इमारतीच्या पाचव्या माळ्यावरील रिफ्युजीच्या मोकळ्या जागेत जाऊन शतपावली करत असत. पाऊस नसल्यावर, मोकळे वातावरण असले की इमारतीच्या तळमजल्याला जाऊन शतपावली करत होते. बुधवारी रात्री नऊ वाजता भोजन झाल्यावर रामचंद्र पवार नेहमीप्रमाणे शतपावली करण्यासाठी नाना विष्णू हाईट्स

सोसायटीच्या पाचव्या माळ्यावर गेले. तेथे इमारतीत काही दुर्घटना घडल्यास बचाव करण्यासाठी मोकळी जागा आहे. या मोकळ्या जागेत रामचंद्र पवार एकटेच चालत होते. चालत असताना त्यांना अचानक चक्कर आली. ते पाचव्या माळ्यावरील मोकळ्या जागेतून थेट इमारती खालील गाळे असलेल्या दुकानांच्या निवाऱ्यावर जोराने पडले. मोठ्याने आवाज झाल्याने रहिवासी आपल्या घरातून बाहेर डोकावू लागले. त्यावेळी त्यांना इमारतीवरून दुकानांच्या गाळ्यांवरील पत्र्यांवर इमारतीत राहणारे रामचंद्र पवार पडल्याचे आणि ते गंभीर असल्याचे दिसले.

रहिवाशांनी आणि कुटुंबीयांनी तातडीने हालचाल करून रामचंद्र पवार यांना पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात नेण्यात आले. विष्णुनगर पोलिसांना ही माहिती देण्यात आली. रुग्णालयात रामचंद्र पवार यांना तपासून डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलीस उपनिरीक्षक आंदुर्लेकर याप्रकरणाचा तपास करत आहेत.