चार सदस्यांचा एक प्रभाग निवडणूक पद्धती : चारदा मतदान केल्यावरच शिटी!

ठाणे महापालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी सहारिया ठाण्यात आले होते.

छायाचित्र प्रातिनिधीक

राज्याचे निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांची माहिती

यंदा राज्यातील मुंबई महापालिका वगळता नऊ महापालिकांमध्ये चार सदस्यांचा एक प्रभाग या पद्घतीने निवडणूक होणार असून त्यात प्रभागातील चारही जागांसाठी मतदान केल्यानंतरच यंत्रामधून मतदान झाल्याचा इशारा देणारी ‘बीप’ वाजेल, अशी माहिती राज्याचे निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी शुक्रवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना दिली. तसेच मतदान यंत्रावर प्रभागातील प्रत्येक जागानिहाय उमेदवारांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक जागेसाठी मतदारांना ‘नोटा’चा पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ठाणे महापालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी सहारिया ठाण्यात आले होते. या वेळी झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. राज्यातील मुंबई महापालिका वगळता नऊ महापालिकांमध्ये बहुसदस्यीय पद्धतीने निवडणुका होणार असून त्यामध्ये चार सदस्यांचा एक प्रभाग असणार आहे. प्रत्येक प्रभागात अ, ब, क, ड याप्रमाणे चार उमेदवार असतील. त्याचप्रमाणे प्रत्येक जागानिहाय उमेदवारांची माहिती मतदान यंत्रावर दिली जाणार आहे. याशिवाय, चारही ठिकाणी ‘नोटा’चा पर्याय दिला जाणार आहे.

चारही ठिकाणी मतदान केल्यानंतरच मतदान झाल्याचा इशारा देणारी ‘बीप’ वाजेल. तसेच चारऐवजी तीन किंवा दोन ठिकाणीच मतदान केले तर मतदान होणार नाही. मात्र अशा वेळी निवडणूक अधिकारी संबंधित मतदारांना मार्गदर्शन करतील. या मतदान प्रक्रियेत मतदारांचा गोंधळ उडू नये म्हणून त्या ठिकाणचे अधिकारी काळजी घेणार आहेत, असे सहारिया यांनी सांगितले.

निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरावा लागणार असून तिथे उमेदवारांना अर्ज योग्य भरला नाही, याची खात्री होईपर्यंत त्यात दुरुस्ती करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येते; मात्र या अर्जाची प्रत त्याला ठरलेल्या मुदतीतच निवडणूक कार्यालयात जमा करावी लागणार आहे. या पद्घतीमुळे उमेदवारी अर्ज बाद होण्याचे प्रमाण घटले आहे, असा दावाही त्यांनी या वेळी केला.

संगणक ज्ञान नाही म्हणून अर्ज भरता आला नाही, अशा स्वरूपाच्या तक्रारी टाळण्यासाठी नागरिक सुविधा केंद्रामध्ये उमेदवारांना प्रशिक्षण देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. याशिवाय, शहरातील सायबर कॅफेचालकांनाही अर्ज कसा भरावा, याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

मतदारांची अंतिम यादी लवकरच

ठाणे महापालिका निवडणुकीतील मतदारांची अंतिम यादी लवकरच केली जाणार असून मतदान केंद्र निश्चित करण्याचेही काम सुरू आहे. निवडणुकीसाठी साहाय्यकनिवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून मतदान केंद्र अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याचे काम सुरू आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर पुरेशी मतदान यंत्रे पुरविली जाणार असून त्यानंतरही मतदान यंत्राची गरज भासत असेल तर ती लगेच दिली जातील, असेही सहारिया यांनी सांगितले. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त कसा असेल, याचाही आढावा घेण्यात आला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: In nine municipalities four member ward election methods