ठाणे : भिवंडी येथील एका कंपनीच्या मालकाने कामगाराला जमाखर्च, कामगारांचे देयक, आर्थिक व्यवहाराचे अधिकार विश्वासाने दिले. परंतु त्याच कर्मचाऱ्याने विश्वासघात करुन तब्बल ७६ लाख त्याच्या स्वत:च्या बँक खात्यात ऑनलाईनरित्या वळविल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात संबंधित कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
सुनीलकुमार यादव (३७) असे या कामगाराचे नाव आहे. भिवंडी येथील अस्मिता पार्क या भागात व्यापाऱ्याचा महिलांचे कपडे तयार करण्याचा व्यवसाय आहे. २०२१ पासून त्यांच्या कंपनीमध्ये सुनीलकुमार यादव नावाचा तरुण कामाला होता. कंपनीचा आर्थिक व्यवहार, कामगारांचे वेतन, जमाखर्च हे सर्व सुनीलकुमार यादव पाहत असे. काही दिवसांपूर्वी व्यापाऱ्याला त्याच्या व्यवसायिक वापरासाठी असलेल्या बँक खात्यातील रक्कम एका खात्यात जमा झाल्याचे त्यांना आढळून आले. त्यांनी सोमवारी बँकेत जाऊन विचारणा केली असता, ते खाते सुनीलकुमार याच्याच नावाने असल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांनी बँक खात्याचे व्यवहार तपासले असता, मार्च २०२४ ते २६ एप्रिल २०२५ या वर्षभराच्या कालावधीत सुनीलकुमार याने टप्प्याटप्प्याने तब्बल ७६ लाख ८६ हजार ७०९ रुपये त्याच्या स्वत:च्या खात्यात वळविल्याचे समोर आले.
यापूर्वी देखील सुनीलकुमार याने व्यापाऱ्याकडून विविध कारणे सांगून पैसे घेतले आहेत. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यापाऱ्याने याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर सुनीलकुमार याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. कोनगाव पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरु आहे.