ठाणे: मुंब्रा येथे एका विवाहित व्यक्तीने त्याच्या प्रियसीची गळा दाबून हत्या केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे. अनैतिक संबंधातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले असून शिळ- डायघर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मोहम्मद अली नासिर हुसैन शेख उर्फ इशान (३८) असे त्या आरोपीचे नाव आहे. तो मुंब्रा परिसरात राहतो. त्याचे बिर्जीस अन्वर हुसैन सईद (३२) या अविवाहित तरुणीसोबत अनेक वर्षांपासून अनैतिक संबंध होते. हेही वाचा : भाजपच्या ठाण्यात केळकरांची कोंडी? मोहम्मद अली नासिर हुसैन शेख हा एका बूट विक्री दुकानात काम करतो. तर, पिडीत महिला विमा कंपनीत काम करत होती. या महिलेचे लग्न ठरले होते. ती आपल्या सोबतचे संबंध संपवणार असल्यामुळे आरोपी संतापला होता. मंगळवारी आरोपी आणि पिडीत महिला हे दोघे डायघरच्या गोटेघर भागातील दीपेश लॉजमध्ये गेले होते. तिथे त्यांच्या वादाला सुरुवात झाली. वाद तीव्र होत गेला. आरोपीने तिला मारहाण केली आणि रागाच्या भरात गळा दाबून तिची हत्या केली. याप्रकरणी शिळ- डायघर पोलीसांनी बुधवारी पहाटे आरोपीला अटक केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.