ठाणे : वागळे इस्टेट येथील मनोरुग्णालय भागात एका रहिवासी इमारतीच्या आवारात चार ते पाच महिन्यांच्या भटक्या श्वानाचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळला. या श्वानाला विष प्राषण करुन किंवा बेदम मारहाण करुन तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप प्राणी प्रेमी संघटनेने केला आहे. त्यानुसार, याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनोरुग्णालय भागात एक रहिवासी इमारत आहे. शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास इमारतीच्या आवारात एका चार महिन्यांचे श्वान बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. या घटनेची माहिती अ लाईफ फॉर ॲनिमल फाऊंडेशन या प्राणी प्रेमी संघटनेला मिळाली. संस्थेच्या अध्यक्षा सोनाली वाघमारे यांनी त्या श्वानाची तपासणी केली असता, श्वानाच्या तोंडातून फेस येत होता. त्यांनी तात्काळ श्वानाला मुंबई येथील पशू वैद्यकीय रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी श्वानाला तपासून मृत घोषित केले.

हेही वाचा…ठाण्यात खड्ड्यांचे विघ्न, पावसात मुख्य मार्गावर वाहतूक कोंडी; दुचाकीस्वारांचा प्रवास धोकादायक

श्वानाच्या मृत्यूबाबत संस्थेच्या सदस्यांनी डॉक्टरांना विचारले असता, श्वानाचा मृत्यू विषारी खाद्य पदार्थ खाल्ल्याने किंवा गंभीर मारहाण केल्यामुळे झाला असावा असे सांगण्यात आले. त्यानंतर सोनाली यांनी याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याआधारे अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.