scorecardresearch

ठाण्यात यंदा लवकर नालेसफाई; पुढच्या आठवड्यात कामांना सुरूवात होणार

दरवर्षीपेक्षा यंदा १५ दिवस आधीच नालेसफाईच्या कामांना सुरुवात

(संग्रहीत छायाचित्र)

ठाणे महापालिका क्षेत्रातील नाले पावसा‌ळ्यात तुंबून आपत्कालनी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने निविदा प्रक्रीया पुर्ण करत येत्या दोन ते तीन दिवसांत नालेसफाईची कामे सुरु करण्याची तयारी सुरु केली आहे.

शहरात दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात नालेसफाईची कामे हाती घेतली जातात. यंदा मात्र एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातच म्हणजेच दरवर्षीपेक्षा १५ दिवस आधीच नालेसफाईच्या कामांना सुरुवात होणार आहे. तशाप्रकारचे नियोजन पालिकेच्या घनकचरा विभागाकडून आखण्यात आले आहे. नालेसफाईची कामे ७ जून अखेरपर्यंत शंभर टक्के पुर्ण केल्यानंतरही पावसाळ्यात नाल्यामधील वाहता कचरा काढण्याचे आणि प्रवाहातील अडथळा दूर करण्याचे काम सप्टेंबर अखेरपर्यंत केले जाणार आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.

ठाणे महापालिकेची पंचवार्षिक मुदत ७ मार्च रोजी संपुष्टात आली असून तेव्हापासून पालिकेत प्रशासकीय राजवट लागू झाली आहे. महापालिकेचे प्रशासक म्हणून कामकाज पाहणारे आयुक्त डॉ. विपीन शर्मा हे दररोज शहरात दौरे करून स्वच्छता, सुशोभिकरण आणि विकासकामांचा आढावा घेत आहेत. त्याचबरोबर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा शहरात दौरे करून विकासकामांचा आढावा घेत आहेत. या दौऱ्यादरम्यान पालकमंत्री शिंदे आणि आयुक्त शर्मा यांनी नालेसफाईची कामे लवकर सुरु करण्याचे निर्देश घनकचरा विभागाला दिले होते. त्यानुसार या विभागाने प्रभाग समितीनिहाय नालेसफाईच्या कामाच्या निविदा काढल्या होत्या. या निविदा उघडण्यात आल्या असून त्यातील दर निश्चिती प्रक्रीया अंतिम टप्प्यात आहे. ही प्रक्रीया पुर्ण करून पुढील आठवड्यात नालेसफाईच्या कामांना सुरूवात करण्याची योजना घनकचरा विभागाने आखली आहे.

नऊ प्रभाग समितीस्तरावर कामाचे विभाजन –

ठाणे महापालिका क्षेत्रात मुख्य नाले आणि त्यास जोडणारी लहान-मोठे नाले असे एकुण ३०० किमी लांबीचे नाले आहेत. नालेसफाईचे काम हे कमी वेळेत व्हावे यासाठी नऊ प्रभाग समितीस्तरावर कामाचे विभाजन कऱण्यात आले आहे. त्यानुसार या कामाच्या निविदा काढण्यात आल्या होत्या. ही कामे करताना मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ, जेसीबी, पोकलेन या मशिनचा वापर करून नाल्यातील गाळ काढण्यात येणार आहे. ज्या नाल्यात मोठ्या प्रमाणात गाळ आहे, त्या नाल्याची सफाई पालटुन यंत्राद्वारे केली जाणार आहे. यंदा विशेषतः पालटून यंत्राद्वारे नाल्यांची खाडीतील मुखे साफ केली जाणार आहेत. या कामावर पर्यवेक्षण करण्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणुक करण्यात येणार आहे. नालेसफाईची कामांचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. तसेच नालेसफाईची कामे ७ जून अखेरपर्यंत शंभर टक्के पुर्ण केल्यानंतरही पावसाळ्यात नाल्यामधील वाहता कचरा काढण्याचे आणि प्रवाहातील अडथळा दूर करण्याचे काम सप्टेंबर अखेरपर्यंत केले जाणार आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.

शहरात रोबोटीक यंत्राद्वारे नालेसफाईची कामे सुरुच –

“गेल्यावर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात नालेसफाईच्या कामांना सुरुवात झाली होती. परंतु यंदा एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात नालेसफाईच्या कामांना सुरुवात होणार आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी शहरातील पाहाणी दौऱ्यादरम्यान नालेसफाईची कामे लवकर सुरु करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार या कामाचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय, शहरात रोबोटीक यंत्राद्वारे नालेसफाईची कामे सुरुच आहेत.” अशी माहिती ठाणे महापालिका उपायुक्त मनीष जोशी यांनी दिली आहे.

प्रभाग समितीनिहाय नाल्यांची संख्या –

कळवा – २०१, नौपाडा – ४९, वागळे इस्टेट – ३८, लोकमान्य-सावरकर – ३४, उथळसर – ३४, वर्तकनगर – २९, माजीवाडा- मानपाडा – ४४, मुंब्रा- ८०, दिवा-१३१

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In thane cleaning of nallas will start soon this year msr

ताज्या बातम्या