scorecardresearch

यंदा ठाणे जिल्ह्यात पाणी कपात नाही; बारवी धरणात मुबलक पाणी साठा

मार्च महिन्याचा अखेरीस याच बारवी धरणात ५० टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे.

thane district, water storage, Barvi dam , water shortage
यंदा ठाणे जिल्ह्यात पाणी कपात नाही; बारवी धरणात मुबलक पाणी साठा

बदलापूर: ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारे बारवी धरण मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत ५० टक्के भरलेले आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होईपर्यंत ठाणे जिल्ह्याला अखंडित पाणी पुरवठा करता येणार असून यंदा कोणतीही पाणी कपात केली जाणार नसल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे. परिणामी जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे.

ठाणे जिल्ह्यातील बहुतांश भागाला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी धरणातून पाणी पुरवठा केला जातो. यात ठाणे, मीरा भाईंदर, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर या महापालिकांसह अंबरनाथ नगरपालिका आणि ग्रामपंचायतीचा समावेश आहे. तसेच ठाणे जिल्ह्यातील बदलापूर, अंबरनाथ, डोंबिवली, ठाणे येथील औद्यागिक क्षेत्रालाही बारवी धरणातून पाणी पुरवले जाते. त्यामुळे बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरणे आवश्यक असते. यंदाच्या वर्षात सप्टेंबर महिन्यात बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. त्यामुळे जिल्ह्याला अविरत पाणी पुरवठा सुरू होता. आता मार्च महिन्याचा अखेरीस याच बारवी धरणात ५० टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे. बारवी धरणाची क्षमता३३८.८४ दशलक्ष लीटर इतकी आहे. ३० मार्च रोजी धरणात १७०.६१ दशलक्ष लीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे धरण एकूण क्षमतेच्या ५०.३६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षात कोणतीही पाणी कपात लागू केली जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना पाणी दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा… ठाण्यात करोना उपचारासाठी आणखी २५ खाटांची स्वतंत्र व्यवस्था; गर्दीच्या ठिकाणी करोना चाचण्या वाढविण्याचे पालिका आयुक्तांचे निर्देश

गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी पाणीसाठा

गेल्या वर्षात बारवी धरणात ३० मार्च रोजी तब्बल ५४ टक्के इतका पाणीसाठा होता. तर धरणात एकूण १८५.९० दशलक्ष लीटर पाणीसाठा उपलब्ध होता. यंदा गेल्या वर्षात तुलनेत ४ टक्के कमी पाणीसाठा आहे. मात्र तरीही यंदाही कोणतीही पाणीकपात करण्याचे नियोजन नसल्याचे जलसंपदा विभागाने सांगितले आहे.

हेही वाचा… डोंबिवलीत प्रवाशाला मारणाऱ्या रिक्षा चालकावर ‘आरटीओ’कडून होणार कारवाई

बारवी धरणासह उल्हास नदीत ज्या आंध्रा धरणातून पाणी सोडले जाते त्या आंध्रा धरणातही यंदा पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे. आंध्रा धरणाची क्षमता ३३९.१४ दशलक्ष लीटर इतकी असून सध्याच्या घडीला धरणात १८७.६४ दशलक्ष लीटर पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे धरण ५५.३३ टक्क्यांनी भरलेले आहे. तसेच भातसा धरणातही यंदा ५३ टक्के भरलेले आहे. भातसा धरणाची क्षमता ९४२.१० दशलक्ष लीटर असून धरणात सध्या ४९९.६४ दशलक्ष लीटर इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-03-2023 at 17:27 IST

संबंधित बातम्या