ठाणे – ठाणे जिल्ह्यात लखपती दिदी योजना यशस्वी ठरत असून आतापर्यंत तब्बल ४७ हजार महिलांनी लखपती दिदीचा दर्जा मिळवला आहे. ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या या योजनेमुळे आज जिल्ह्यातील अनेक महिलांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होत आहे. बचत गटांच्या माध्यमातून या महिलांनी स्वतःचे अनेक व्यवसाय सुरु केले आहेत. या लघु उद्योगांच्या माध्यमातून महिलांनी आपले वार्षिक अर्थार्जन वाढविले आहे. भविष्यातही याच पद्धतीने अनेक महिलांना लखपती दीदी करण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपयोजना राबवत आहे.
ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बचत गटांचे जाळे पसरले आहे. जिल्ह्यात सध्या १० हजारांहून अधिक बचत गट कार्यरत आहेत. तर या बचत गटांशी सुमारे १ लाख महिला जोडल्या गेल्या आहेत. या महिलांसाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. याच पद्धतीने देशातील ग्रामीण महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारकडून ‘लखपती दिदी योजना’ राबविण्यात येत आहे.
या योजनेअंतर्गत बचत गटांशी जोडलेल्या महिलांना विविध उत्पन्नवाढीच्या उपक्रमांद्वारे दरवर्षी किमान एक लाख रुपये उत्पन्न मिळवून देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या योजनेत स्वयं-सहायता गटातील महिलांना शेतीपूरक व्यवसाय, पशुपालन, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन, हस्तकला, अन्नप्रक्रिया, शिवणकाम, किराणा व्यवसाय अशा विविध उद्योगांचे प्रशिक्षण देण्यात येते. त्यासोबतच बँक कर्ज, अनुदान, बाजारपेठेची जोड आणि मार्गदर्शनही पुरवले जाते.
‘लखपती दिदी’ म्हणजे अशी महिला जी स्वतःच्या व्यवसायातून किंवा उपक्रमातून वर्षाला किमान एक लाख रुपये उत्पन्न मिळवते. या योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांचे उत्पन्न वाढत असून त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा होत आहे. अनेक महिला आज उद्योजिका बनत असून गावपातळीवर रोजगारनिर्मितीलाही चालना मिळत आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासोबतच त्यांचा आत्मविश्वास वाढवणे, नेतृत्वगुण विकसित करणे आणि समाजात त्यांचा सन्मान उंचावणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
केंद्र सरकारचे लक्ष्य देशभरात कोट्यवधी महिलांना ‘लखपती दिदी’ बनवण्याचे असून ठाणे जिल्ह्यातूनही या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. चौकट महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ”उमेद अंतर्गत जिल्ह्यात एकूण १०९७४ स्वयं सहाय्यता समुहांची स्थापना असून एकूण ८६६ ग्रामसंघ तसेच ३४ प्रभागसंघ आहेत. एकूण १,११,५८४ महिला या बचत गटांशी जोडल्या गेलेल्या आहेत. उमेद अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या “लखपती दीदी ” योजनेच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील गेल्या एक वर्षाच्या कालावधीत मध्ये एकूण ४७ हजार ७३२ स्वयंसहाय्यता गटांतील महिलांचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांहून अधिक झाले आहे. तसेच यंदाच्या आर्थिक वर्षात एकूण ४२१७६ महिलांना लखपती दीदी करण्याचे नियोजन असून यामध्ये सध्या एकूण १९१६६ महिला लखपती दीदी झाल्याची नोंद करण्यात आलेली आहे.
महिलांनी शेती आधारित, बिगर शेती आधारित, पशुपालन, समुदाय गुंतवणूक निधी, जोखीम प्रवणता निधी, उत्पादक गट स्थापना तसेच विविध उपक्रम राबवत शहापूर आणि अंबरनाथ तालुक्यात या योजना राबवून ठाणे जिल्ह्यात १०० % लखपती दीदी करण्यात यश मिळाले आहे. अर्थातच बचत गटांशी जोडल्या गेलेल्या सर्व महिलांचे वार्षिक उत्पन्न हे एक लाखांहून अधिक झाले आहे.

