ठाणे – हृदयविकारासारखा जीवघेणा आजार आता केवळ विशिष्ट वयोगटापुरता मर्यादित राहिलेला नाही. बदलती जीवनशैली, सततचा तणाव, व्यसनाधीनता आणि शारीरिक हालचालींचा अभाव या कारणांमुळे आजच्या तरुण व मध्यमवयीन नागरिकांमध्येही हृदयविकाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन वर्षांत ठाणे जिल्ह्यात एकूण २ हजार २४३ नागरिकांचा मृत्यू हृदयविकारामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या मृत्यूंपैकी १ हजार ३२३ मृत्यू पुरुषांची आहे तर स्त्रियांची संख्या ९२० इतकी आहे.
गेल्या काही वर्षाच्या कालावधीत केवळ ठाणे जिल्हा नव्हेच तर राज्यात आणि देशातही हृदयविकाराने ग्रासलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर यातील मृत्यूंची संख्या देखील चिंताजनक आहे. करोनाच्या काळात याचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनास आले होते. पूर्वी हृदयविकारासारखा आजार हा प्रामुख्याने वयाची साठी पार केलेल्या, म्हणजेच ६० वर्षांवरील नागरिकांमध्येच आढळून यायचा. त्याकाळी प्रमाण तुलनेने कमी होते आणि मृत्यूची कारणंही इतर होती. मात्र गेल्या दशकभरात परिस्थितीत झपाट्याने बदल झाला आहे. आता फक्त ज्येष्ठ नागरिकच नव्हे, तर ४० ते ५० वयोगटातील व्यक्तींपासून अगदी ३० च्या आसपासच्या तरुणांपर्यंत हृदयविकाराचे प्रमाण वाढले आहे. विशेष म्हणजे, अनेकांना हृदयविकाराची सौम्य लक्षणंही माहिती नसतात. छातीत अचानक दुखणे, घशातून वर दाब जाणवणे, घाम येणे, दम लागणे, डाव्या हाताला किंवा पाठीत दुखणे, उलटीसारखे वाटणे ही लक्षणं वारंवार दिसत असूनसुद्धा ती दुर्लक्षित केली जातात. परिणामी अनेक प्रकरणांमध्ये रुग्णाला रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू होतो आहे.
जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार या मृत्यू मागील मुख्य कारणे म्हणजे वाढता मानसिक तणाव, व्यसनांचे प्रमाण, उच्च रक्तदाब, मधुमेह, धूम्रपान, मद्यपान, फास्ट फूडचा अतिरेक, व्यायामाचा अभाव आणि झपाट्याने बदलत चाललेली जीवनशैली. यामुळे हृदयाचे कार्य क्षीण होत असून, अनेकांना हृदयविकारांना सामोरे जावे लागत आहे. तसेच वाढता तणाव आणि व्यसनाधीनता ही आजच्या पिढीला सर्वात मोठी जोखीम ठरत आहे. विशेषतः शहरांतील युवकांमध्ये रात्रीची अपुरी झोप, ऑफिसचा तणाव, सोशल मीडियाचा अतिरेक आणि व्यसनांचे आकर्षण यामुळे हृदय आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. अशी प्रतिक्रिया जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलाश पवार यांनी दिली आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य विभागाने विविध उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. मोफत आरोग्य शिबिरे, हृदय आरोग्य तपासणी मोहीमा, शाळा-महाविद्यालयांमध्ये जनजागृती कार्यक्रम, कार्यस्थळी मानसिक तणाव कमी करण्यासाठी वर्कशॉप्स अशा माध्यमातून नागरिकांमध्ये आरोग्यविषयी जागरुकता निर्माण केली जात आहे. तर एनपीएनसीडी या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या अंतर्गत जिल्हा रुग्णालयांमध्ये रुग्णांची विशेष खबरदारी घेऊन त्यांना वेळोवेळी उपचार दिले जातात. तर याबाबत त्या रुग्णांमध्ये जनजागृती कारण देखील करण्यात येते.
हृदयविकाराने मृत्यू
वर्ष – २०२४
पुरुष – ४९४
स्त्री – ३४४
एकूण – ८३८
वर्ष – २०२३
पुरुष – ४११
स्त्री – २८५
एकूण – ६९६
वर्ष – २०२२
पुरुष – ४१८
स्त्री – २९१
एकूण – ७०९