बदलापूर : गेल्या काही वर्षांपासून ठप्प असलेल्या भटक्या श्वानांच्या निर्बिजीकरणाच्या प्रक्रियेमुळे बदलापुरात भटक्या श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. निर्बिजीकरणाच्या प्रक्रियेसाठी कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाने निविदा जाहीर केली. मात्र प्रतिसादाअभावी या निविदेला मुदतवाढ देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे निर्बिजीकरणाची प्रक्रिया सुरू होण्यासाठी किती वेळ लागेल याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांची लोकसंख्या गेल्या काही वर्षात झपाट्याने वाढली आहे. वाढत्या लोकसंख्येसोबतच शहरात भटक्या श्वानांची पैदासही वाढली. गृहसंकुलांच्या कचराकुंड्या, उघड्यावर बाजारपेठा, दुकाने आणि खाद्यपदार्थांच्या दुकानांबाहेर टाकले जाणारे अन्नपदार्थ यावर भटक्या श्वानांची गुजराण होते. गेल्या काही वर्षात या दोन्ही शहरांमध्ये निर्बिजीकरणाची प्रक्रिया ठप्प होती. अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रात काही महिन्यांपूर्वी या प्रक्रियेला सुरूवात झाली. हेही वाचा : डोंबिवली रेल्वे स्थानकात रेल्वे मार्गातून प्रवाशांची ये-जा मात्र प्रभावीपणे त्याची अजूनही अंमलबजावणी होत नसल्याने भटक्या श्वानांची संख्या वाढतीच आहे. दुसरीकडे बदलापूर शहरात कुळगाव बदलापूर नगरपालिकेला भटक्या श्वानांच्या निर्बिजीकरणासाठी कंत्राटदारच मिळत नसल्याचे समोर आले आहे. कुळगाव बदलापूर नगरपालिकेने भटके श्वान आणि मांजरींचे निर्बिजीकरण करणे, त्यांना रेबीज प्रतिबंधक लस देणे यासाठी निविदा जाहीर केल्या होत्या. या निविदांची मुदत २१ सप्टेंबर रोजी संपली. मात्र एकाही कंत्राटदाराने या निविदेला प्रतिसाद दिला नाही. हेही वाचा : कलारंग प्रतिष्ठान ढोल-ताशा पथकाचा उपक्रम, सात दिवसांच्या गणपतींचे सामुहिक विसर्जन करण्यासाठी फडके रस्त्यावर नियोजन त्यामुळे कुळगाव बदलापूर नगरपालिकेवर या निविदेला मुदतवाढ देण्याची वेळ आली आहे. आता पालिका प्रशासनाने येत्या ३ ऑक्टोबरपर्यंत या निविदेला मुदतवाढ दिली आहे. कंत्राटदार न मिळाल्याने भटक्या श्वानांच्या निर्बिजीकरणाची प्रक्रिया कधी सुरू होईल याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. "आम्ही निर्बिजीकरणासाठी संस्थेच्या शोधात आहोत. मात्र या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था कमी असल्याने अडचण आहे. लवकरच संस्था मिळून कामाला गती मिळेल", असे कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी म्हटले आहे. हेही वाचा : कल्याण-डोंबिवली परिवहन सेवेच्या बस थांब्यांना खासगी वाहनांचा विळखा अंबरनाथ शहरात निर्बिजीकरण सुरू असल्याचा दावा पालिका प्रशासन करत असली तरी रस्ते, चौक या ठिकाणी भटक्या श्वानांची संख्या वाढलेलीच दिसते आहे. तर बदलापुरात जवळपास सर्वच रस्ते, चौक, बाजारपेठा आणि चक्क रेल्वे स्थानकावरही भटके श्वान आढळून आले आहेत.