ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात हळदी सभारंभानिमित्ताने रात्री उशीरापर्यंत डिजेचा दणदणाट केला जात असतानाच, आता सार्वजनिक ठिकाणी रात्री १२ वाजेनंतर वाढदिवस साजरा करण्याची नवी प्रथा सुरू झाली आहे. सार्वजनिक ठिकाणी काही जण टोळक्याने जमा होऊन तिथेच केप कापण्याबरोबरच गोंगाट करत फटाक्यांची आतषबाजी करून वाढदिवस साजरा करतात. याप्रकारामुळे नागरिक हैराण झाले आहेत तर, घटनास्थळी पोहचण्याआधीच टोळी निघून जात असल्याने पोलिसही हतबल झाले आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून रस्त्यावर सण-उत्सव साजरे करण्याची परंपरा सुरू आहे. यासाठी रस्ते अडवून मंडप उभारणी करण्याबरोबरच डिजेचा दणदणाटही केला जातो. शहरात सण-उत्सावानिमित्ताने मिरवणूका काढल्या जातात. राजकीय पक्षांच्याही मिरवणुका निघतात. या प्रकारामुळे वाहतूक कोंडी होण्याबरोबरच ध्वनी प्रदुषण होते.

या संदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल झाल्या होत्या. त्यावर सुनावणी देताना उच्च न्यायालयाने सण-उत्सवांसाठी मार्गदर्शन नियमावली तयार करण्याचे आदेश पालिकांना दिले होते. त्यानुसार, पालिकेने मंडप उभारणीपासून ते ध्वनी क्षेपकाच्या वापरापर्यंत नियमावली तयार केली असून त्याची गेल्या तीन ते चार वर्षांपासून अंमलबजावणी केली जात आहे. यानिमित्ताने सण-उत्सवांसाठी निर्बंध आले असले तरी हळदी सभारंभ तसेच खासगी घरगुती कार्यक्रमांसाठी डिजेचा वापर केला जात असून रात्री उशीरापर्यंत डिजेचा दणदणाट सुरू असल्याचे चित्र दिसून येते.

हळदी सभारंभानिमित्ताने रात्री उशीरापर्यंत डिजेचा दणदणाट केला जात असतानाच, आता सार्वजनिक ठिकाणी रात्री १२ वाजेनंतर वाढदिवस साजरा करण्याची नवी प्रथा सुरू झाली आहे. शहरातील विविध चौक, रस्ते अशा सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरे करण्यासाठी टोळकी रात्री १२ वाजेनंतर जमा होतात. रस्त्यावरच खुर्ची किंवा वाहनांवर केक ठेवून तो कापला जातो. वाढदिवसांच्या शुभेच्छा देण्यासाठी गोंगाट केला जातो. त्यात भरीस भर म्हणून फटाक्यांची आतषबाजी केली जाते.

या गोंगाटामुळे नागरिकांची झोप मोड होत आहे. याबाबत काही नागरिक पोलिसांच्या नियंत्रण कक्षामध्ये तक्रारी नोंदवितात. मात्र, नियंत्रण कक्षाकडून तक्रारीची माहिती मिळताच स्थानिक पोलिस वाढदिवस साजरा होत असलेल्या ठिकाणी पोहचतात. तोपर्यंत वाढदिवस साजरा करून ही टोळकी तेथून निघून गेलेली असतात. गेल्या काही महिन्यांपासून असे प्रकार वाढीस लागल्याने पोलिसही हतबल झाले आहेत. १० ते १५ मिनिटात ही टोळकी वाढदिवस करून तेथून पसार होतात. त्यामुळे त्यांना पकडणेही शक्य होत नाही, असे पोलिसांनी सांगितले.

इच्छूक उमेदवारांचीही साथ

निवडणुक जिंकण्यासाठी उमेदवार वाट्टेल ते करण्यास तयार असतात. मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी ते नवनवीन शक्कल लढवित असतात. आता शहरातील रस्त्यावर रात्री १२ वाजेपर्यंत वाढदिवस साजरे होत असून त्यात आता काही ठिकाणी इच्छूक उमेदवारही भेटी देऊ लागले आहेत. वाढदिवस असलेल्या व्यक्तीला पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसांच्या शुभेच्छा देत आहेत, अशी माहिती काही नागरिकांनी दिली.

प्रतिक्रिया

ठाण्यात पाचपाखाडी परिसरातील गल्लीतल्या एखाद्या दादा, भाईचा वाढदिवस असो किंवा लग्नाची हळद, भर रस्त्यात मंडप घालतात. संध्याकाळी ६ वाजल्यापासून लाऊडस्पीकर आणि फटाके वाजत असतात. वाढदिवस असेल तर रात्री १२ वाजल्यापासून फटाके सुरू होतात ते २ वाजेपर्यंत. अचानक फटाके वाजल्याने झोपेत असताना दचकायला होते, तर वयस्कर लोकांना बीपीचा त्रास होतो. रात्रीच्या वेळी फटाक्यांची माळ लावली जाते, सुतळी बॉम्ब फोडले जातात. फटाक्यांच्या आवाज मर्यादा नाही, वेळ-काळ काही नाही. हळदीला फटाक्याच्या जोडीला लाऊड स्पीकर असतात. परवानगी नावाचा प्रकार असतो की नाही माहीत नाही. ११२ क्रमांकावर फोन केला तर ते माहिती घेतात, पण पुढे काही होत नाही, असे पाचपखाडी भागात राहणाऱ्या कपालिनी सिनकर यांनी सांगितले.