ठाणे : पालकांसह शाळा विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम करत असते. या संस्कारामुळे बालवयात विद्यार्थ्यांमध्ये माणूसकीची भावना निर्माण होते. असाच अनुभव ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये पाहायला मिळाला. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी साठवलेले ‘खाऊचे पैसे’ सैनिकांच्या कुटूंबासाठी देऊन एक आगळा वेगळा आदर्श समाजासमोर निर्माण केला आहे.
भिवंडी तालुक्यातील केंद्र राहनाळ अंतर्गत जिल्हा परिषद शाळा कालवार येथील विद्यार्थ्यांनी “खाऊचे पैसे सैनिकांच्या कुटुंबासाठी” हा आगळा-वेगळा व प्रेरणादायी उपक्रम राबवून समाजासमोर राष्ट्रप्रेमाचे जिवंत उदाहरण सादर केले आहे. देशसेवेसाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या भारतीय जवानांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम शाळेतील इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे राबविला.या उपक्रमांतर्गत जमा झालेली ११ हजार १७० ही रक्कम ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या कार्यालयामार्फत सैनिक कल्याण निधी कार्यालयात जमा करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या या नाविन्यपूर्ण, देशप्रेमाने ओतप्रोत उपक्रमाचे जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष कौतुक केले. शाळेच्या परिपाठादरम्यान शिक्षक प्रशांत भोसले यांनी ही संकल्पना मांडली असता, सर्व शिक्षकवृंदाने तिचे स्वागत केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका अनिला काबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेमध्ये मूल्यशिक्षणावर आधारित विविध उपक्रम सातत्याने राबविले जात असून, शाळा व्यवस्थापन समिती कालवार यांचाही या उपक्रमात सक्रिय सहभाग राहिला. “आपण रोज आवडीचे पदार्थ खातो, मात्र आपले सैनिक अनेकदा अर्धपोटी राहून सीमेचे रक्षण करतात” ही जाणीव विद्यार्थ्यांच्या मनात रुजताच, त्यांनी आपला खाऊचा पैसा गल्ल्यात जमा करण्यास सुरुवात केली.
विद्यार्थ्यांना संकल्पना कशी सुचली….
शाळेत विद्यार्थ्यांना भारतीय जवानांचे जीवन, त्यांचे त्याग, सीमेवरील हालअपेष्टा आणि कठीण प्रसंग यांची माहिती चित्रफीत व कथनाच्या माध्यमातून देण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात सैनिकांप्रती आदर व आपुलकीची भावना निर्माण झाली. त्यातून ही अनोखी कल्पना सुचली. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाची माहिती पालकांना मिळताच, त्यांनीही स्वतः शाळेत येऊन शक्य तितकी आर्थिक मदत गल्ल्यात जमा केली. त्यामुळे उपक्रमाला अधिक बळ मिळाले. तसेच गावकऱ्यांकडूनही या उपक्रमास भरभरून शुभेच्छा मिळाल्या.
विद्यार्थ्यांनी निधी कसा जमा केला ?
गणेशोत्सवाच्या काळात शासनाच्या सूचनेनुसार शिक्षणाचा प्रसार व प्रचार व्हावा या उद्देशाने इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये जाऊन गवळण व साक्षरता गीतांचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांच्या या विशेष धडपडीने प्रभावित होऊन ग्रामस्थांनी आरतीच्या ताटात मोठ्या प्रमाणावर शुभेच्छारूपी दान दिले. ही संपूर्ण रक्कम विद्यार्थ्यांनी सैनिक निधीसाठीच्या गल्ल्यात जमा केली.
