scorecardresearch

ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थान परिसरात पाणी साचले ; पालिका यंत्रणेची उडाली तारंबळ

लुईसवाडी भागातील निवासस्थान परिसरातील सखल भागात पाणी साचले होते

eknath shinde House
(मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानेचे संग्रहीत छायाचित्र)

ठाणे शहरात आज (गुरूवार) पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांबरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लुईसवाडी भागातील निवासस्थान परिसरातील सखल भागात पाणी साचले होते. हा परिसर जलमय झाल्याचे कळताच पालिका यंत्रणेची तारंबळ उडाली आणि त्यांनी याठिकाणी धाव घेऊन पंपांच्या सहाय्याने साचलेल्या पाण्याचा उपसा केला. या भागात पावसाचे पाणी पुन्हा साचू नये, यासाठी पालिकेने याठिकाणी पाणी उपसा करण्यासाठी पंप ठेवण्याबरोबरच त्याच्या संचलनासाठी कर्मचारी नेमण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.

ठाणे शहरात सोमवारपासून जोरदार पाऊस पडत आहे. आज सकाळी पावसाचा जोर कायम होता. आज पहाटेच्या वेळेस तासभरात ३० मिमी पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले होते. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लुईसवाडी भागातील ‘शुभ-दीप’ या बंगल्याच्या परिसरातील सखल भागात पाणी साचले होते. या परिसरात सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांनी याबाबत ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्षाला माहिती दिली. त्यानंतर या विभागासह पालिका यंत्रणाची तारंबळ उडाली. आपत्ती व्यवस्थापन विभागासह अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन जवानाने पंप लावून साचलेल्या पाण्याचा उपसा करण्याचे काम सुरु केले. काही वेळात परिसरात साचलेल्या पाण्याचा निचरा झाला.

या सखल भागामध्ये मुसळधार पाऊस झाल्यानंतर पुन्हा पाणी साचू शकते. ही बाब लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने याठिकाणी पाणी उपसा करण्यासाठी पंप ठेवण्याबरोबरच त्याच्या संचलनासाठी कर्मचारी नेमण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In thane the roads around the chief ministers house were flooded msr

ताज्या बातम्या