मागील दोन दिवसांपासून मुंबईसह उपनगरांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. या वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी दुर्घटनादेखील घडल्या आहेत. अशातच ठाण्यात फुटबॉल खेळणाऱ्या मुलांच्या अंगावर टीनशेड कोसळल्याची घटना घडली आहे. यात सात मुलं गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. शुक्रवारी रात्री ८ च्या सुमारास ही घटना घडली.

हेही वाचा – Video: ‘राहोवन’ वादानंतर IIT मुंबईची विद्यार्थ्यांवर कारवाई; सव्वा लाखांचा दंड, हॉस्टेलमधून निलंबन, संस्था संचालक म्हणतात…

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी रात्री ठाण्यातील एका टर्फमध्ये काही मुलं फुटबॉल खेळत होती. यावेळी अचानक पाऊस आणि वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. या वाऱ्यामुळे शेजारच्या इमारतीवरील टीनशेट थेट या मुलांच्या अंगावर येऊन कोसळले. या घटनेत सात मुलं गंभीर जखमी झाली. त्यांना उपचाराकरिता जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हेही वाचा – मुंबई : दोन्ही मार्गिकांवरील मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ, आता २४ अतिरिक्त फेऱ्या

दरम्यान, या घटनंतर आज शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते प्रताप सरनाईक यांनी रुग्णालयात जाऊन जखमी मुलांची भेट घेतली. तसेच त्यांना सरकारकडून मदतीचे आश्वासन दिले. यासंदर्भात बोलताना, ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी याठिकाणी १७-१८ जण फुटबॉल खेळत होते. जोरदार हवेमुळे शेजारच्या इमारतीवरून एक टीनशेट या मुलांच्या अंगावर येऊन कोसळले. यात ७ जण गंभीर जखमी झाले. यापैकी ४ जणं बरे असून तिघांची प्रकृती नाजूक आहे, अशी माहिती त्यांनी दिली. पुढे बोलताना, या मुलांवर उपचार सुरू असून राज्य सरकारतर्फे त्यांना आवश्यक ती मदत केली जाईल, असं आश्वासनही त्यांनी दिलं.