महापालिका निवडणुकीसाठी यापुर्वी जाहीर करण्यात आलेले अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसाठीचे आरक्षण क़ायम ठेवत र्वरित जागांवर नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण महिला अशा जागांसाठी शुक्रवारी सोडतीद्वारे नव्याने आरक्षण निश्चित करण्यात आले. या आरक्षणाचा फटका स्थायी समितीचे माजी सभापती संजय भोईर यांच्यासह काही नगरसेवकांना फटका बसला आहे. तर राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सुहास देसाई यांना मात्र फायदा झाला आहे. तसेच माजी महापौर एच.एस. पाटील आणि माजी नगरसेवक संजय पांडे हे एकाच प्रभागातून दोन निवडणुक लढविण्यासाठी इच्छूक असून त्या प्रभागातील दोन जागा महिलांसाठी आरक्षित झाल्याने त्याचा त्यांना फटका बसला आहे. त्यापैकी एकाला आता दुसरा प्रभाग शोधावा लागणार आहे.

ठाणे महापालिकेची निवडणूक २०११ सालच्या जणगणनेनुसार होणार आहे. यानुसार शहराची लोकसंख्या १८ लाख ४१ हजार ४८८ इतकी आहे. या लोकसंख्येनुसार एकूण ४७ प्रभाग तयार करण्यात आले आहेत. त्यापैकी ४६ प्रभाग तीन सदस्यांचा तर एक प्रभाग चार सदस्यांचा आहे. या प्रभागांमधून एकूण १४२ नगरसेवक निवडून जाणार आहेत. त्यापैकी ५० टक्के म्हणजेच ७१ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यात अनुसूचित जातीसाठी १०, अनुसूचित जमातीसाठी सोडतद्वारे आरक्षण निश्चित करण्यात आले होते. त्याचबरोबर ६४ जागा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ४७ जागा निवडणूक आयोगाने नेमून दिल्या होत्या. तर उर्वरित १७ जागांकरीता आरक्षण सोडत काढण्यात आली होती. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (ओबीसी) आरक्षण वगळून ही प्रक्रीया पार पाडण्यात आली होती. दरम्यान, सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशानंतर अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसाठी यापुर्वी जाहीर केलेले आरक्षण कायम ठेवत उर्वरित जागांवर नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण महिला अशा जागांसाठी शुक्रवारी सोडतीद्वारे नव्याने आरक्षण निश्चित करण्यात आले.

प्रभागांचे आरक्षण
अनुसूचित जातीसाठी आयोगाने थेट आरक्षित केलेल्या १० प्रभागांपैकी ३, १२, १५, २३, २९ मधील अ जागा महिलांसाठी राखीव करण्यात आल्या आहेत. तर, १०, २४, २७, ३४ आणि ४४ मधील ‘अ’ अनुसूचित जातीच्या पुरुषांसाठी यापुर्वीच राखीव झाल्या आहेत. अनुसूचित जमातीसाठी अयोगाने थेट आरक्षित केलेल्या ३ प्रभागांपैकी ५ अ, २९ ब जागा महिलांसाठी तर, ६ अ जागा अनुसूचित जमातीच्या पुरुषांसाठी यापुर्वीच निश्चित करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी झालेल्या आरक्षण सोडतीत नागरिकांचा मागास वर्ग महिलांकरिता ४, ४३, ४६,२, ७,१९,१४,४२ या प्रभागातील अ जागा तर, नागरिकांचा मागास वर्ग पुरुषांकरिता २६, २८, १७, २०, ३२, ४७, १६ या प्रभागातील अ जागा आरक्षित झाली आहे. सर्वसाधारण महिलांकरिता ३२ जागा राखीव करण्यात आल्या आहेत. त्यापैकी सर्वसाधारण महिलांकरिता ३, १८,१९, २३, ३०, ३३, ३६, ३७, ३९, ४३ या प्रभागातील ब जागा निवडणूक आयोगाने नेमून दिल्या होत्या. तर, १, १४, ५, ३१, १३, ३८, ९, २२, ४१, ११, ४०, ७, १२, ४, ४६, २, १५, २५, ८, २१, ४५ या प्रभागातील ब जागा सोडतीद्वारे सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत.

आरक्षण सोडतीचा फटका
महापालिका निवडणुकीसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसाठी यापुर्वी जाहीर केलेले आरक्षण कायम ठेवत उर्वरित जागांवर नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण महिला अशा जागांसाठी शुक्रवारी सोडतीद्वारे नव्याने आरक्षण निश्चित करण्यात आले. यामध्ये अनेक प्रभागातील दोन जागा महिलांसाठी राखीव झाल्या असल्या तरी तिसऱ्या जागेवर मात्र पुरुष उमेदवाराला निवडणुक लढविणे शक्य होणार आहे. घोडबंदर येथील प्रभाग क्रमांक १ मधून शिवसेनेचे नरेश मणेरा आणि सिद्धार्थ ओवळेकर असे दोन नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी एकाला आरक्षणाचा फटका बसणार असला तरी त्या नगरसेवकाला शेजारच्या म्हणजेच ५ क्रमांकाच्या प्रभागातून निवडणुकीच्या रिंगणात उभे करण्यात येणार असल्याचे समजते. तर, प्रभाग क्रमांक ९ मधून स्थायी समितीचे माजी सभापती संजय भोईर, त्यांची पत्नी उषा भोईर आणि त्यांचे वडील देवराम भोईर हे निवडणुक लढविण्याच्या तयारीत होते. परंतु या प्रभागातील दोन जागा महिलांसाठी राखीव झाल्याने त्याचा फटका संजय भोईऱ यांना बसला आहे तर त्यांना आता दुसरा प्रभाग शोधावा लागणार आहे. तर, प्रभाग क्रमांक ८ मधून माजी महापौर एच.एस. पाटील आणि माजी नगरसेवक संजय पांडे हे निवडणुक लढविण्यासाठी इच्छूक असून याठिकाणी दोन जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत.

सोडतीचा फायदा
गेल्या निवडणुकीत राबोडी भागातून राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला आणि सुहास देसाई हे दोघे एकाच प्रभागातून निवडून आले होते. या भागात नव्या रचनेत प्रभाग क्रमांक १८ तयार करण्यात आला असून त्याठिकाणी दोन जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. त्यामुळे सुहास देसाई यांना आरक्षणाचा फटाका बसल्याचे बोलले जात होते. परंतु जुने आरक्षण रद्द होऊन नव्या आरक्षणात या प्रभागात एकच जागा महिलांसाठी राखीव झाल्याने देसाई यांचा निवडणुक लढविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.