उल्हासनगर : कोणत्याही ठिकाणी बेकायदा पद्धतीने लावले जाणारे जाहिरात फलक, होर्डींग याविरूद्ध उल्हासनगर महापालिका प्रशासनाने आक्रमक भूमिका घेत अशी बॅनरबाजी करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्यास सुरूवात केली आहे. गेल्या काही दिवसात उल्हासनगर महापालिकेने केलेल्या कारवाईत १३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापुढेही ही कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती उल्हासनगर महापालिका प्रशासनाने दिली आहे.

शहरात कोणत्याही ठिकाणी बेकायदा जाहिरात फलक, होर्डीग, प्रदर्शित होणार नाहीत यादृष्टीने उच्च न्यायालयाने जनहित याचिका क्रमांक १५५/२०११ मध्ये आदेश दिलेले आहेत. हा आदेश शहरातील नागरिकांच्या तसेच सर्व राजकीय पक्षांच्या निदर्शनास यापूर्वी वेळोवेळी आणून दिलेले आहेत. त्यानंतरही उल्हासनगर शहरात ठिकठिकाणी राजकीय व्यक्ती, कंपन्या आणि इतर जाहिरातींचे फलक प्रदर्शित होत असल्याचे पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आले होते.

त्यामुळे उल्हासनगर महापालिका प्रशासनाने प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तांना अशा फलकबाजीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर उल्हासनगर महापालिकेच्या प्रभाग समिती अधिकाऱ्यांनी आपापल्या प्रभागात कारवाई केली होती. त्यानंतर प्रभाग समिती १ ते ४ कार्यालयाच्या अखत्यारितील विविध ठिकाणी १३ गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकानुसार दिली आहे.

यात उल्हासनगर पोलीस ठाण्यात ४, मध्यवर्ती पोलीस ठाण्यात ३, विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात ४, हिललाईन पोलीस ठाण्यात २ असे एकूण १३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उल्हासनगर महापालिका विनापरवानगी अनधिकृत होर्डींग, जाहिरात फलकांवर दररोज कारवाई केली जात असून नागरिकांनी अशाप्रकारे फलकबाजी न करण्याचे आवाहन केले आहे.