scorecardresearch

शिंदे-आव्हाडांमध्ये शब्दयुद्ध; खारेगाव रेल्वे उड्डाणपुलाच्या उद्घाटन सोहळ्यात आधी मैत्रीच्या आणाभाका, नंतर टीका

२००९ मध्ये मी आमदार झालो तेव्हापासून कळवा आणि मुंब्रा या शहरांमध्ये झालेल्या विकासकामांमधील बदल सर्वांनाच जाणवेल.

खारेगाव रेल्वे उड्डाणपुलाच्या उद्घाटन सोहळ्यात आधी मैत्रीच्या आणाभाका, नंतर टीका

ठाणे : कळवा पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या बहुचर्चित खारेगाव रेल्वे उड्डाणपूल लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड या महाविकास आघाडीतील दोघा मंत्र्यांमध्ये जोरदार टोलेबाजी रंगलेली पाहायला मिळाली. या कामाचे श्रेय घेण्यावरून गेल्या काही दिवसांपासून दोन्ही पक्षांमध्ये जोरदार संघर्ष सुरू असल्याचे पाहायला मिळाले. या श्रेयवादाचे रूपांतर राजकीय फटकेबाजीत झाले.  

या कार्यक्रमात आव्हाड आणि शिंदे या दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या अबोल मैत्रीच्या आणाभाका घेत महाविकास आघाडी मजबूत करा, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले खरे मात्र कार्यक्रमानंतर काही तासांतच आव्हाड आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यात कलगीतुरा रंगल्याने हा संघर्ष कायमच असल्याचे दिसून आले. या पुलाच्या कामाचे श्रेय घेण्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांमध्ये गेल्या काही दिवसांपासून श्रेयवाद सुरू आहे. मंत्री आव्हाड यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच पुलाच्या कामाचा इतिहास सर्वांसमोर मांडताना जोरदार फटकेबाजी केली. संपूर्ण कार्यक्रमात आव्हाडांच्या फटकेबाजीचा रोख खासदार शिंदे आणि महापौर नरेश म्हस्के यांच्यावर होता.

२००९ मध्ये मी आमदार झालो तेव्हापासून कळवा आणि मुंब्रा या शहरांमध्ये झालेल्या विकासकामांमधील बदल सर्वांनाच जाणवेल. यासाठी मला निधी मागण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडे कधीच जावे लागले नाही. हा त्यांच्या मनाचा हा मोठेपणा आहे. महापौर नरेश म्हस्के यांनी मात्र ‘मिशन कळवा’, असे संबोधले. हे ‘मिशन कळवा’ काय आहे हे मात्र मला समजले नाही. महापौर तुम्ही चाणक्य आहात, नारदमुनी होऊ नका, असा टोला आव्हाड यांनी या वेळी लगाविला.

या वेळी बोलताना खासदार श्रीकांत शिंदे यांनीही आव्हाडांना टोले हाणले. महापालिकेत शिवसेनेची सत्ता असली तरी पालकमंत्र्यांचे आव्हाडांवर खूपच प्रेम आहे. त्यामुळे कळवा-मुंब्रा भागातील विकासकामांसाठी पालकमंत्र्यांनी आतापर्यंत दोन हजार कोंटीचा निधी दिल्याचा उल्लेख केला. या वेळी पालकमंत्री शिंदे यांनी ‘मिशन कळवा’ म्हणजे महाविकास आघाडीचे जास्त नगरसेवक निवडून आणणे आहे. महाविकास आघाडी म्हणून एकत्रित जनतेची कामे करू या. पालिकेत शिवसेनेची सत्ता असली तरी कमिशनचे राजकारण केले नाही. तसेच आयुक्तांना कधी फोन करून सांगितले नाही की ही माझी फाइल आहे. वेळप्रसंगी आम्ही एकमेकांना भिडलो परंतु कमरेखाली वार केले नाही आणि यापुढेही करणार नाही. ते रक्तात नाही, असे शिंदे म्हणाले. 

पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमानंतर मंत्री आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये नाते जपायला तेवढी परिपक्वता असावी लागते. गरम रक्त आहे. आपण बापाच्या भूमिकेत आहोत. आपण त्यांना सांभाळायला हवे, असे श्रीकांत शिंदे यांचे नाव न घेता सुनावले. त्यावर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रतिउत्तर दिले. मुलाच्या यशाचा बापाला कधीच त्रास होत नाही. तो नेहमीच प्रोत्साहन देतो. पण इथे उलट असून मुलाच्या यशाने बापाला त्रास होतोय, असे खासदार शिंदे म्हणाले.

राजकारणापलीकडची मैत्री

एकनाथ शिंदे आणि आमची मैत्री राजकारणापलीकडची आहे, त्यात एक अबोलपणा आहे. त्यामुळे श्रीकांत शिंदे तुम्ही कधी याबाबत त्यांना विचारा, असे आव्हाड या वेळी म्हणाले. नजरेची भाषा थेट हृदयाला भिडते आणि त्यातून मैत्री भक्कम राहाते. अशीच आमची एकनाथ शिंदे यांच्याबरोबर मैत्री आहे. त्यामुळे खासदार श्रीकांत शिंदे आपणही ही भाषा समजून घ्या, असा टोला त्यांनी हाणला. आमची मैत्री आहे हे खरे आहे, हे सर्वांसमोर खुले आहे. पोटात एक आणि ओठात एक असे आम्ही कधीच वागत नाही. निवडणुकांमध्ये आम्ही दोघे पक्षाचे काम करतो पण निवडणूक संपल्यानंतर कोणतीही अढी ठेवत नाही, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Inauguration ceremony of kharegaon railway flyover eknath shinde jitendra awhad akp

ताज्या बातम्या