लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : ठाणे, पनवेल आणि जेएनपीटी भागातील वाहतूकीसाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या शिळफाटा रस्त्यावर उड्डाणाची उभारणी करण्यात आली असून या पुलावरील पनवेल मार्गिकेचे सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकापर्ण झाले. यानंतर ही मार्गिका वाहतूकीसाठी खुली झाली आहे. यामुळे जेएनपीटीसह ठाणे मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होणार असून त्याचबरोबर प्रवाशांचा वेळ, पैसा आणि इंधनाची बचत होण्यास मदत होईल, असा दावा प्रशासनाने केला आहे.

मुंबई महानगरातील वाहतूकीसाठी शिळफाटा हा रस्ता महत्वाचा मानला जातो. या मार्गावरून ठाणे आणि पनवेलच्या दिशेने नोकरदार वर्गाच्या वाहनांची वाहतूक सुरू असते. त्याचबरोबर उरण येथील जेएनपीटी बंदरातून ठाणे, नाशिक, भिवंडी आणि गुजरातच्या दिशेने अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. ही वाहतूक शिळफाटा मार्गे सुरू होते. यामुळे सतत वाहन वर्दळीचे ठिकाण असलेल्या शिळफाटा मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती. ही समस्या सोडविण्यासाठी या मार्गावर उड्डाण पुलाची उभारणी करण्याचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हाती घेतले होते. सुमारे ४५ कोटी ६८ लाख रुपये खर्चुन हा पुल उभारण्यात आला आहे. या पुलावरील पनवेल दिशेच्या मार्गिकेचे काम ३० महिन्याच्या कालावधीनंतर पुर्ण झाले असून या मार्गिकेचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले.

आणखी वाचा-फेरीवाल्यांविरोधात गुन्हे दाखल होण्यास सुरूवात, महिन्याभरात ४ हजारहून अधिकजणांविरोधात गुन्हे

या उड्डाणपुलावर दोन्ही बाजूला प्रत्येकी तीन-तीन मार्गिका आहेत. या पुलाची एकूण रुंदी २४ मीटर आहे. पुलाची एकूण लांबी ७३९.५ मीटर आहे. पुलाच्या व्हायाडक्टची लांबी तीनशे मीटर आहे तर, मुंब्रा बाजूकडील (ए-१) आणि पनवेल बाजूकडील (ए-२) मार्गिका अनुक्रमे २७१.५ मीटर आणि १६८ मीटर लांबीची आहे. त्यापैकी पनवेल दिशेकडे जाणारी मार्गिका लोकार्पणानंतर वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. मुंब्रा दिशेची मार्गिका येत्या दोन महिन्यात खुली करण्याचे नियोजन प्राधिकरणाने आखले आहे. मुंबई आणि आसपासच्या भागातील वाहतूक कोंडी कमी व्हावी या उद्देशातून एमएमआरडीने या पुलाची उभारणी केली आहे. या पुलामुळे राष्ट्रीय महामार्ग ४८ वरील ठाणे आणि जेएनपीटी दरम्यानची वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होईल आणि या मार्गाचा वापर केल्याने प्रवाशांचा वेळ, पैसा आणि इंधनाची बचत होण्यास मदत होईल, असा दावा प्रशासनाने केला आहे.

आणखी वाचा-सुरक्षेच्या कारणास्तव गणपत गायकवाड सकाळीच पोलिसांच्या फौजफाट्यासह न्यायालयात

शीळफाटा उड्डाणपूल एमएमआर क्षेत्रातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या पुलाचे लोकार्पण करत असताना मला फार आनंद झाला आहे. मुंबई महानगर क्षेत्राचा शाश्वत विकास व्हावा यासाठी एमएमआरडीए सातत्याने प्रयत्न करत असून या प्रयत्नांना आम्ही सातत्याने पाठबळ देत आलो आहोत याचे मला समाधान आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकार्पण कार्यक्रमादरम्यान बोलताना दिली.

मुंबई महानगर क्षेत्र आणि त्याच्या आसपासच्या भागात एमएमआरडीए विविध विकास कामे करत आहे. या सगळ्या विकास कामांचे उद्दीष्ट हे एकच आहे ते म्हणजे संपूर्ण एमएमआर क्षेत्राचा शाश्वत विकास करणे. त्यामुळे मार्गांची उभारणी करत असताना ती शाश्वत पद्धतीने व्हावी हा आमचा प्रयत्न असतो. हाच दृष्टीकोन ठेवून राष्ट्रीय महामार्ग ४८ वर शिळफाटा उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. या पुलामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल आणि सोबतच इंधनाचीही बचत होईल. -डॉ. संजय मुखर्जी, आयुक्त, एमएमआरडीए

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inauguration of panvel margika on shilphata flyover traffic on jnpt and thane route will be reduced mrj
First published on: 14-02-2024 at 11:24 IST