भगवान मंडलिक

कल्याण : पावसाळय़ाच्या दिवसांत डोंगरखोऱ्यांत उगवणाऱ्या रानभाज्यांना शहरी भागांतूनही मागणी वाढू लागली आहे. त्यातच श्रावण महिन्यात मागणी वाढल्याने आणि त्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने रानभाज्यांच्या दरांत घसघशीत वाढ झाली आहे. अर्थात या भाज्या ठरावीक मोसमानुसारच मिळत असल्याने तसेच त्या रुचकर, पौष्टिक असल्याने ग्राहक जास्त पैसे मोजूनही त्या खरेदी करत आहेत.

ठाणे, डोंबिवली, कल्याण रेल्वे स्थानक परिसरात मलंगगड परिसर, भिवंडी, बदलापूर, अंबरनाथ, पनवेल, तळोजा, शहापूर, मुरबाड भागातील आदिवासी, ग्रामीण महिला सकाळीच रानभाज्या घेऊन येतात. जून ते ऑक्टोबर हा रानभाज्यांचा काळ असतो. संपूर्णपणे नैसर्गिकरीत्या वाढल्या असल्याने या भाज्या रुचकर आणि आरोग्यदायी असतात. त्यामुळे त्यांना मागणीही जास्त असते. श्रावण महिन्यात रानभाज्यांना विशेष पसंती दिली जाते. दरम्यान, गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा रानभाज्यांचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याचे शामल गेडाम या भाजी विक्रेत्या महिलेने सांगितले. त्यामुळे या भाज्यांचे दर वाढले आहेत. ‘श्रावण महिन्यात ही मागणी वाढते. या भाज्या आरोग्यासाठी उत्तम असतात. त्यामुळे ग्राहकांची या भाज्यांसाठी अधिकची मागणी असते,’ असे नंदिनी शिंदे या विक्रेत्याने सांगितले. 

जंगलात शेकडो प्रकारची वनसंपदा असते. गवत, झुडपे यांचा धांडोळा घेत अचूक रानभाजी शोधणे हे मोठे कसब असते. ठरावीक आदिवासी महिलांना रानभाज्यांची माहिती असल्याने त्या गटाने जंगल भागात अचूक ठिकाणी जाऊन रानभाज्यांचा शोध घेतात. यावेळी त्यांना जंगलातील उपद्रवी वनस्पतींना तोंड द्यावे लागते. प्रत्येक रानभाजी ठरावीक परिसरातच आढळते. करटोली, टाकळा, लोथ, घोळू, करडू, दिंडे, खापरा, शीन, कोळू, माठ, रानमाठ, काटेमाठ, तांदुळजा, आघाडाची कोळी पाने या रानभाज्या त्या त्या पट्टय़ातच आढळतात. या रानभाज्यांचा काळ एक ते दोन महिने असतो. त्यानंतर या भाज्यांचा बहर ओसरतो, असे रानभाज्या विक्रेत्या महिलांनी सांगितले.

भाज्यांचे दर

  • करटोली २० रुपये वाटा (८ करटोली)
  • लोथ- २५ रुपये जुडी
  • कोळू – २५ रुपये जुडी
  • दिंडे- २० रुपये जुडी
  • करडू- २० रुपये वाटा
  • खापरा- १५ रुपये जुडी
  • शीन -२५ रुपये वाटा
  • आघाडा कोळी पाने – २० रुपये वाटा
  • टाकळा -२५ रुपये
  • घोळू – २५ रुपये
  • शेवगा कोवळी पाने – १५ रुपये