scorecardresearch

वाढत्या उकाडय़ावर बीअरचा उतारा!

गेल्या वर्षीचा पावसाळा कोरडा सरकल्यामुळे यंदाचा उन्हाळा अधिकच तापदायक ठरला आहे.

वाढत्या उकाडय़ावर बीअरचा उतारा!

मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये गेल्या अडीच महिन्यांत पाच कोटी लिटर बीअर रिचवली
उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागताच तीव्र पाणीटंचाईमुळे ठाणेकरांच्या तोंडचे पाणी पळाले असले तरी गेल्या अडीच महिन्यांत ठाणे जिल्ह्य़ात बीअरचे मात्र अक्षरश पाट वाहिले आहेत! अंगाची लाही लाही करून सोडणाऱ्या या उन्हाळय़ात घशाला पडणारी कोरड शमवण्यासाठी ठाणे, पालघरमधील नागरिकांनी गेल्या अडीच महिन्यांत तब्बल दोन कोटी २८ लाख लिटर बीअर रिचवली. राज्य उत्पादन शुल्क विभागाने उघड केलेल्या या आकडेवारीनुसार बीअर रिचवण्याच्या बाबतीत ठाणे, पालघर या जिल्ह्यांनी मुंबई आणि रायगड या नजीकच्या जिल्ह्यांनाही मागे टाकले. या चारही जिल्ह्यांतून मिळून गेल्या अडीच महिन्यांत तब्बल पाच कोटी लिटर बीअरची विक्री झाली आहे.
गेल्या वर्षीचा पावसाळा कोरडा सरकल्यामुळे यंदाचा उन्हाळा अधिकच तापदायक ठरला आहे. आधीच पाणीटंचाई त्यात आग ओकणारा सूर्य यांमुळे यंदा ‘ऊन जरा जास्त आहे’ असं म्हणण्याऐवजी ‘ये रे ये रे पावसा’चा धोशा मार्चपासूनच सुरू झाला आहे. अशा उकाडय़ात घशाला वारंवार पडणारी कोरड शमवण्यासाठी लिंबू सरबत, उसाचा रस, शीतपेये यांच्याकडे ओढा वाढतो. परंतु, ऋतुमानाप्रमाणे मद्यप्रकार बदलण्यात पटाईत असलेल्या तळीरामांनी मात्र आपला मोर्चा बीअरकडे वळवला. तापत्या उन्हातून तावूनसुलाखून आल्यानंतर फेसाळत्या थंडगार बीअरचे घोट रिचवताना तळीरामांनी यंदा आधीच्या वर्षांचे विक्रमही मोडीत काढले. त्यामुळेच यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यात गेल्या काही वर्षांच्या तुलनेत बीअरची सर्वाधिक विक्री झाली. मे महिन्यात तर हा विक्रमही मागे पडण्याची शक्यता उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
ठाणे, रायगड आणि मुंबई शहर व उपनगर या परिसरांतील बीअरविक्रीची आकडेवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाने ‘लोकसत्ता ठाणे’समोर मांडली. या आकडेवारीनुसार या तिन्ही जिल्ह्यांत मिळून तळीरामांनी उन्हाळय़ात ५ कोटी लिटर बीअरचा ‘डोस’ घेतल्याचे उघड होते. मुंबई, उपनगर आणि रायगडच्या तुलनेत ठाणे, पालघर जिल्ह्यांतील बीअरची विक्री जास्त आहे. मार्चमध्ये मुंबईत १९.२७, उपनगरात ५१.२९ आणि रायगडमध्ये १६.७८ लाख लिटर बीअर विक्री झाली होती तर त्याचवेळी ठाणे व पालघर जिल्ह्यांत ७८.२४ लाख लिटर बीअरची विक्री झाली. एप्रिल महिन्यामध्ये मुंबईत १७.०५, उपनगरात ५०.८२, आणि रायगडमध्ये १९.१३ लाख लिटर विक्री झाली होती, तर ठाणे, पालघरमध्ये ७०.६६ लाख लिटर बीअरची विक्री झाली आहे. मे महिन्यामध्येही ही विक्री अधिक वाढण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-05-2016 at 06:27 IST

संबंधित बातम्या