कल्याण – कल्याण, डोंबिवली शहराच्या विविध भागांत गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक रस्त्यावर, इमारतीच्या तळमजल्यावरील वाहनतळावर उभ्या करून ठेवण्यात आलेल्या दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. या वाहन चोरींमुळे वाहन मालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बाजारात खरेदीसाठी आलेले, दुकानासमोर उभ्या करून ठेवण्यात आलेल्या दुचाकीही चोरट्यांनी चोरल्या आहेत.

डोंबिवली पश्चिमेत शास्त्रीनगर भागात राहणारे अभिषेक भंडारे यांची दुचाकी त्यांच्या राहत्या घराच्या तळमजल्यावरील वाहनतळावरून चोरट्याने चोरून नेली आहे. कल्याणमधील आधारवाडी भागात राहणारे किराणा दुकानदार हरिश चौधरी यांची दुचाकी गुरुदेव ग्रॅन्ड हाॅटेलजवळील रस्त्यावरून गेल्या पंधरा दिवसांपूर्वी चोरीला गेली आहे. कल्याणजवळील सापर्डे गावात राहणारे जनार्दन मढवी या भाजी विक्रेत्याची दुचाकी कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील गोपाळ कृष्ण हाॅटेलसमोरील रस्त्यावरून चोरट्याने बनावट चावीचा वापर करून चोरून नेली आहे. कल्याणमधील छायाचित्रकार मुर्तझा चंपली यांनी गजानन हायस्कूलसमोरील रस्त्यावर आपली दुचाकी उभी करून ठेवली होती. ते आपले काम उरकून पुन्हा घटनास्थळी आले तर दुचाकी गायब असल्याचे दिसले. परिसरात त्यांनी शोध घेतला पण दुचाकी आढळून आली नाही.

हेही वाचा – ठाणे स्थानकात अपघातप्रवण फलाटाचा प्रवाशांना धसका

हेही वाचा – कल्याणमध्ये गणपती दर्शनासाठी घरात येऊन तृतीयपंथीय टोळीकडून सोन्याच्या ऐवजाची चोरी

या वाहन चोरीप्रकरणी तक्रारदारांनी विष्णुनगर, महात्मा फुले पोलीस ठाणे, बाजारपेठ आणि खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या आहेत.
भुरटे चोर डोंबिवली, कल्याणमधील बाजारांमध्ये पाळत ठेऊन या दुचाकी वाहनांची चोरी करत असल्याचे व्यापारी सांगतात. बांगलादेशमधील जाळपोळीनंतर अनेक मागतेकरी, बांगलादेशी शहर परिसरातील मोकळ्या जागांमध्ये राहण्यास आले आहेत. शहर परिसरातील बेकायदा चाळींमध्ये वास्तव्य करून असलेले हे चोरटे या चोऱ्या करत असल्याचा तक्रारदारांना संशय आहे.