ठाणे जिल्ह्यात करोनाचा संसर्ग वाढण्याबरोबरच मृत्युंची मालिका सुरुच असून गुरुवारी ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एका रुग्णांचा मृत्यु झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील करोनामुळे मृत्युची संख्या चार इतकी झाली आहे.ठाणे जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून कमी झालेला करोनाचा संसर्ग गेल्या पंधरा दिवसांपासून पुन्हा वाढू लागला आहे. ठाणे जिल्ह्यात गुरुवारी ३६ करोना रुग्ण आढळून आले असून त्यापैकी ठाणे शहरात सर्वाधिक म्हणजेच २२ इतके रुग्ण आहेत. ठाणे जिल्ह्यात करोना सक्रीय रुग्णांची संख्या तीनशे पार गेली होती. परंतु त्यापैकी काही रुग्ण उपचार घेऊन बरे झाल्याने सक्रीय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे शहरात २८९ सक्रीय रुग्ण आहेत.
हेही वाचा >>>कडोंमपा पालिका शाळेत ६४२ शाळाबाह्य मुलांना प्रवेश
त्यापैकी १८७ रुग्ण हे एकट्या ठाणे महापालिका क्षेत्रातील आहेत. तर, कल्याण-डोंबिवली शहरात २७, नवी मुंबई शहरात २५ , उल्हासनगर शहरात २, भिवंडी शहरात १८, मिरा-भाईंदर शहरात १०, बदलापूर शहरात १ आणि ग्रामीण भागात १९ इतके सक्रीय रुग्ण आहेत. रुग्ण संख्येत आघाडीवर असलेल्या ठाणे शहरात गेल्या आठ दिवसांत तीन वृद्धांचा मृत्यु झाला असून त्यापैकी एकाला ‘एच ३ एन २’ इन्फ्ल्युएंझा या आजाराचीही लागण झाल्याचे वैद्यकीय तपासणी अहवालातून उघड झाले होते. ठाणे शहरात करोनामुळे मृत्युची मालिका सुरु असतानाच, गुरुवारी ठाणे ग्रामीण भागात एका रुग्णांचा मृत्यु झाला आहे.