करोना रुग्णांचा प्रसार वाढू नये यासाठी ठाणे महापालिकेने शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये संपूर्ण टाळेबंदीचा फास आवळण्यास सुरुवात केली असताना नौपाडा, पाचपाखाडी भागांतील व्यापाऱ्यांनी मात्र सामाजिक अंतराचे नियम योग्य रीतीने पाळले जावेत असे वाटत असेल तर दिवसभर दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्याचा पर्याय प्रशासनासमोर ठेवला आहे. दिवसभरात जेमतेम तीन तास दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी असल्याने खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडत आहे. त्यामुळे टाळेबंदी कठोर पद्धतीने राबवली जाईल, तितके तिचे परिणाम दिसतील, असा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे.

ठाणे शहरात बुधवार सायंकाळपर्यंत बाधितांची संख्या एक हजार ४६३ इतकी झाली आहे. संक्रमणाची ही साखळी तोडण्यासाठी पालिका प्रशासनाने अनेक ठिकाणी २५ मेपर्यंत संपूर्ण टाळेबंदी लागू केली आहे. नौपाडा, पाचपाखाडी आणि महागिरी परिसरातील भाजी विक्रीची दुकाने पूर्णपणे बंद करण्यात आली आहेत. या भागातील किराणा मालाची दुकाने, तसेच इतर जीवनावश्यक दुकाने सकाळी ७ ते १० या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. संपूर्ण टाळेबंदीचा निर्णय घेत पालिका प्रशासन स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात धन्यता मानत असले तरी या निर्णयाचे विपरीत परिणाम आता दिसू लागले आहेत. सकाळी तीन तासांत शहरातील जांभळी नाका बाजारपेठ, महात्मा फुले बाजारपेठ आणि महागिरी बाजारपेठ या घाऊक बाजारांमध्ये इतर किरकोळ दुकानदारांची आणि ग्राहकांची खरेदीसाठी मोठी गर्दी उसळत आहे. शहरातील इतर ठिकाणीही अशीच परिस्थिती आहे. या गर्दीमुळे व्यापाऱ्यांना सामाजिक अंतर पाळता येणे अशक्य झाले आहे.

शहरातील किराणामालासह सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत खुली ठेवण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी आता शहरातील व्यापारी करीत आहेत. वेळ वाढवून मिळाल्यास दुकानांमधील ग्राहकांची गर्दी नियंत्रणात येणे शक्य होईल, असे व्यापाऱ्यांनी म्हटले आहे.

नियमांचे काटेकोर पालन करण्याची हमी

‘ठाणे घाऊक बाजार व्यापारी असोसिएशन’च्या वतीने गुरुवारी सकाळी शहरातील व्यापाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी शहरातील सुमारे १०० व्यापारी आणि माथाडी कामगारांचे सदस्य उपस्थित होते. बैठकीत उपस्थित सर्व व्यापाऱ्यांनी सामाजिक अंतराचे नियम पाळले होते. या वेळी महापालिकेने दुकाने खुली करण्यासाठी लागू केलेल्या तीन तासांच्या नियमांमुळे ग्राहकांची होणारी गर्दी रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर सर्व व्यापाऱ्यांनी चर्चा केली. महापालिकेकडून शहरातील करोनाची साखळी तोडण्यासाठी

२५ मेपर्यंत विविध भागांत लागू करण्यात

आलेल्या टाळेबंदीचे सर्व व्यापारी काटेकोर पालन करणार असल्याची माहिती असोसिएशनचे केतन कारीआ यांनी दिली. त्याचबरोबर २६ मेपासून किराणा आणि जीवनावश्यक वस्तूंची दुकाने

खुली ठेवण्यासाठी सकाळी ८ ते ६ वाजेपर्यंत परवानगी मिळावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने महापालिका प्रशासनाकडे केली जाणार असल्याचेही ते म्हणाले.