तीन सदस्यीय रचनेमुळे महापालिकेत ४४ प्रभागांची निर्मिती

ठाणे : ठाणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीत तीन सदस्यांचा एक प्रभाग करण्याचे राज्य सरकारने निश्चित केले आहे. मात्र, २०११च्या जनगणनेच्या आधारेच प्रभागांची रचना केली जाणार आहे. त्यामुळे नगरसेवकांची संख्या १३१ इतकीच राहणार असून प्रभागांची संख्या मात्र ४४ इतकी होईल, असा अंदाज पालिका सूत्रांनी वर्तवला आहे.

 पुढील वर्षी म्हणजेच, फेब्रुवारी २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच गेल्या दीड वर्षांत मुदत संपलेल्या राज्यातील महापालिकांची (मुंबई वगळून) निवडणूक तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार आहे. याबाबत राज्य शासनाने नुकताच निर्णय घेतला आहे. ठाणे महापालिकेत बहुतांश प्रभाग चार सदस्यांचे होते. मात्र, यंदा एका प्रभागात तीन सदस्य असतील. परिणामी प्रभागांची संख्या ३८वरून ४४ इतकी होण्याचा अंदाज पालिकेतील सूत्रांनी व्यक्त केला आहे.

महापालिकेच्या निवडणुकीत नगरसेवकांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त होत होती. मात्र, २०२१ची जनगणना होऊ न शकल्याने आता २०११च्या जनगणनेच्या आधारेच लोकसंख्या विचारात घेण्यात येईल. २०११ च्या जनगणनेनुसार पालिका क्षेत्राची लोकसंख्या १८ लाख इतकी होती. त्याआधारे २०१२ आणि २०१७मध्ये निवडणूक झाली. त्यापैकी २०१७ मध्ये नगरसेवकांची संख्या १३१ होती. ती यंदाही कायम राहणार आहे.

गत निवडणुकीतील रचना

 ठाणे महापालिकेची २००२ मध्ये तीन सदस्य प्रभाग पद्धतीने निवडणूक झाली होती. २००१ च्या जणगणनेनुसार पालिका क्षेत्राची लोकसंख्या १२ लाख होती. ३० ते ३५ हजार लोकसंख्येनुसार ३८ प्रभागांची रचना केली होती. २०१७ मध्ये चार सदस्य प्रभाग पद्धतीने निवडणुका झाल्या होत्या. ५० ते ६० हजारांचा एक प्रभाग अशी रचना यावेळी करण्यात आली होती.

‘झेड’ की वर्तुळाकार

 गेल्या वेळेस प्रभाग ‘झेड’ पद्धतीने प्रभाग रचना करण्यात आली होती. यानुसार संपूर्ण शहरात ३२  प्रभाग चार सदस्यांचे तर, दिव्यातील एक प्रभाग तीन सदस्यांचा होता. आता ४३ प्रभाग तीन सदस्यांचे तर, एक प्रभाग दोन सदस्यांचा होण्याची शक्यता आहे. ‘झेड’ पद्धतीने प्रभाग रचना झाल्यास दिवा भागात दोनचा प्रभाग होईल आणि वर्तुळाकार पद्धतीने रचना झाल्यास नौपाडा भागात दोनचा प्रभाग होऊ शकेल.

ठाणे महापालिकेची तीन सदस्य प्रभाग पद्धतीने निवडणूक घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून त्यासंबंधीचा अध्यादेश शासनाकडून प्राप्त होताच, प्रभाग रचनेचे काम सुरू करण्यात येईल. करोना परिस्थितीमुळे नवीन जनगणना झालेली नसल्यामुळे जुन्याच म्हणजेच दहा वर्षांपूर्वीच्या जनगणनेनुसारच प्रभागांची रचना केली जाणार आहे. 

डॉ. विपीन शर्मा, आयुक्त, ठाणे महापालिका