ठाणे : दिव्यातील अनधिकृत शाळांच्या विरोधात इंडिपेंडेंट स्कूल मॅनेजमेंट असोसिएशन या संघटनेने १ जुलै पासून दिव्यातील सर्व अधिकृत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. परंतू, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने संबंधित संघटनेला हा बेमुदत संप मागे घेण्याचे आवाहन केले होते. अखेर पालिकेच्या या आवाहनाला प्रतिसाद देत संप तूर्तास स्थगित करण्यात आला असल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली. तसेच पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील दिशा ठरविण्यात येईल, असे देखील स्पष्ट करण्यात आले.
दिव्यातील अनधिकृत शाळा वारंवार तक्रार करूनही बंद होत नाही. यामुळे या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याकडे शिक्षण विभागाचे लक्ष वेधण्यासाठी इंडिपेंडेंट स्कूल मॅनेजमेंट असोसिएशन या संघटनेने १ जुलै पासून दिव्यातील सर्व अधिकृत शाळा बेमुदत बंद ठेवण्या चा निर्णय घेतला होता. या संदर्भातील पत्र संघटनेने ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाला दिले होते.
परंतू, या संपामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याची खबरदारी घेत ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने शाळा बंद आंदोलन मागे घेण्याचे आवाहन संघटनेला पत्राद्वारे केले. ठाणे महापालिकेच्या आवाहनाची दखल घेऊन संघटनेने शाळा बेमुदत बंद चा संप तूर्तास स्थगित केला आहे. पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील दिशा ठरविण्यात येईल, असे इंडिपेंडेंट स्कूल मॅनेजमेंट असोसिएशनच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.