ठाणे : देशाच्या विकासाचा आराखडा ठरवणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या प्रक्रियेला अर्थातच जनगणना २०२७ला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. यंदा प्रथमच नागरिकांना ‘स्व-गणना’ (Self-Enumeration) या डिजिटल सुविधेद्वारे स्वतःची माहिती स्वतः नोंदवण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अभिनव उपक्रमामुळे जनगणना अधिक अचूक, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित होणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी नागरिकांना या सुविधेचा सक्रियपणे लाभ घेण्याचे आवाहन करताना सांगितले की, “जनगणना ही केवळ लोकसंख्येची मोजणी नसून देशाच्या सर्वांगीण विकासाचे मूळ आधार आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपली माहिती जबाबदारीने आणि वेळेत नोंदवणे अत्यंत आवश्यक आहे.
ठाणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व नागरिकांना या राष्ट्रीय उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. डिजिटल पद्धतीने ‘स्व-गणना’ पूर्ण केल्यास प्रशासनाचा वेळ व संसाधने वाचण्यास मदत होईल आणि देशाच्या विकासासाठी अधिक अचूक माहिती उपलब्ध होईल.
जनगणनेतून मिळणारी माहिती देशातील धोरणनिर्मिती, पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, रोजगार, गृहनिर्माण आणि सामाजिक कल्याण योजनांसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचे नियोजन आणि अंमलबजावणी ही याच डेटावर आधारित असते. त्यामुळे अचूक आणि अद्ययावत माहिती देणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य मानले जाते.
महत्त्वाच्या तारखा कोणत्या?
स्व-गणना कालावधी हा १ मे ते १५ मे २०२६ इतका आहे. या कालावधी मध्ये नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने आपली आणि कुटुंबाची माहिती देता येणार आहे. तर घरयादी व घरगणना टप्पा हा १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत पार पडणार आहे. या कालावधीत नागरिकांनी स्वतःहून माहिती भरल्यास, पुढील प्रत्यक्ष भेटीत प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद होईल.
‘स्व-गणना’ कशी कराल?
नागरिकांसाठी ही प्रक्रिया सोपी आणि वापरकर्ता अनुकूल ठेवण्यात आली आहे. यासाठी अधिकृत पोर्टल https://se.census.gov.in/ वर भेट द्या. कुटुंब प्रमुखाचे नाव आणि मोबाईल क्रमांक नोंदवा. OTP द्वारे पडताळणी पूर्ण करा. यानंतर आपल्या सोयीची भाषा निवडा. त्यानंतर पिन कोडच्या आधारे घराचे अचूक स्थान निश्चित करा. यानंतर घराची माहिती, जातीचा उल्लेख नमूद करून दिलेल्या प्रश्नावलीतील सर्व प्रश्नांची अचूक माहिती भरून ‘Submit’ करा.
SE ID का महत्त्वाचा?
नोंदणी पूर्ण केल्यानंतर ‘H’ अक्षराने सुरू होणारा ११ अंकी Self-Enumeration ID (SE ID) दिला जाईल. हा आयडी अत्यंत महत्त्वाचा असून, तो जतन करून ठेवणे आवश्यक आहे. पुढील टप्प्यात प्रगणक घरभेटीवर आल्यास, हा आयडी दाखविल्यास प्रक्रिया अधिक जलद आणि सोपी होईल.
