ठाणे – ठाणे शहरात भारतातील पहिले ‘रंग संग्रहालय’ आणि शंभर वर्षे जुन्या ऐतिहासिक बाजारपेठांच्या पुनर्विकास करण्याची मागणीसाठी भाजपचे आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांनी आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन त्यासमोर या दोन्ही प्रकल्पाचे सादरीकरण केले. दरम्यान, आयुक्तांनीही त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला असून या प्रकल्पांमुळे ठाण्याला सांस्कृतिक, आर्थिक आणि पर्यटन क्षेत्रात मोठी चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी भाजप आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे या दोघांनी नुकतीच भेट घेऊन शहराच्या सर्वांगीण विकासासाठी दोन महत्त्वाचे प्रस्ताव सादर केले. हे प्रस्ताव केंद्र सरकारच्या अर्बन चॅलेंज फंड अंतर्गत राबविण्याचा विचार असून, शहराच्या सांस्कृतिक ओळखीबरोबरच आधुनिक विकासाला चालना देण्याचा उद्देश आहे.

पहिल्या प्रस्तावात ठाण्यात भारतातील पहिले ‘रंग संग्रहालय’ उभारण्याची योजना आहे. पारंपरिक संग्रहालयांपेक्षा वेगळा अनुभव देणाऱ्या या प्रकल्पात रंगांचे विज्ञान, मानसशास्त्र, दृष्टी, ऑप्टिकल इल्यूजन आणि सांस्कृतिक महत्त्व यांचे १२ दालनांमधून सादरीकरण केले जाणार आहे. हा प्रकल्प शिक्षण आणि पर्यटनासाठी नवे आकर्षण ठरण्याची चिन्हे आहेत.

दुसऱ्या प्रस्तावात ठाण्यातील जांभळी नाका येथील शंभर वर्षांहून अधिक जुन्या शिवाजी भाजी मंडई आणि महात्मा फुले मंडई यांच्या पुनर्विकासाचा समावेश आहे. या बाजारपेठांचे ऐतिहासिक महत्त्व जपत त्यांना आधुनिक सुविधा देण्यावर भर देण्यात येणार आहे. विक्रेते आणि ग्राहकांसाठी अधिक सुसज्ज, हवेशीर आणि सुलभ बाजारपेठ उभारण्याबाबत प्रस्तवात म्हटले आहे. या पुनर्विकासात शीतगृह सुविधा तसेच खुल्या आणि पारंपरिक बाजाराच्या अनुभवाला जपणारी रचना यांचा समावेश असेल. यामुळे विक्रेत्यांचे उत्पन्न वाढण्यास आणि ग्राहकांना अधिक सोयीस्कर खरेदी अनुभव मिळण्यास मदत होईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

आयुक्तांची प्रतिक्रिया

ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी सादर करण्यात आलेल्या दोन्ही विकास प्रस्तावांचे कौतुक करत त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. अर्बन चॅलेंज फंड अंतर्गत हे प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.