ठाणे : जपानच्या सुझुकी मोटर कॉर्पोरेशनच्या सुझुकी मोटरसायकल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एसएमआयपीएल) या उपकंपनीने भारतातील पहिल्या ‘सुझुकी लाउंज”चे उद्घाटन भिवंडी येथील पिंपळघर भागात सुरू केले आहे. त्यामुळे आधुनिक सर्व्हिस वर्कशॉप, प्रीमियम ग्राहक लाउंज आणि नवीन वाहनांच्या प्रदर्शनाची सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच भिवंडीत आऊटलेट माॅलचे उद्घाटन झाले होते. आता सुझुकी लाउंज सुरु झाल्याने जगभरातील मोठ्या कंपन्या भिवंडीच्या दिशेने आकर्षित होत असल्याचे दिसते.

‘सुझुकी लाउंज’मध्ये ग्राहकांसाठी आरामदायी बसण्याची व्यवस्था, कॅफे-शैलीतील रिसेप्शन आणि संवादासाठी स्वतंत्र जागा तयार करण्यात आली आहे. तसेच लाकडी डिझाइन आणि आकर्षक प्रकाशयोजनेमुळे ग्राहकांना वेगळाच अनुभव मिळणार आहे. या लाउंजचे वैशिष्ट्य म्हणजे देखभाल दुरुस्ती वर्कशॉप आणि ग्राहक लाउंज यांच्यात काचेच्या भिंतीद्वारे भिंत (ग्लास पार्टिशन) जोडणी करण्यात आली आहे. त्यामुळे वाहन देखभाल दुरुस्ती सुरू असताना ग्राहकांना लाउंजमध्ये बसून वर्कशॉपमधील कामकाज पाहता येणार आहे.

ठाण्यातील या केंद्रात चार सेवा कक्ष उपलब्ध आहेत. याशिवाय, लाउंजला लागून नवीन मोटरसायकल आणि स्कूटरच्या प्रदर्शनासाठी स्वतंत्र जागा तयार करण्यात आली आहे. त्यामुळे वाहन देखभाल, दुरुस्तीसाठी आलेल्या ग्राहकांना सुझुकीच्या नव्या वाहनांची माहिती आणि वैशिष्ट्ये जाणून घेता येणार आहेत. सुझुकी मोटरसायकल इंडियाचे सेल्स आणि आफ्टर सेल्सचे एक्झिक्युटिव्ह ऑफिसर हरी कृष्ण के. यांनी सांगितले की, ग्राहकांना केवळ सेवा न देता पारदर्शकता, आराम आणि प्रीमियम अनुभव देण्याच्या उद्देशाने ‘सुझुकी लाउंज’ची संकल्पना साकारण्यात आली आहे.

पिंपळघर येथील रिद्धी ऑटो एजन्सीज एलएलपी (रिद्धी सुझुकी) या सुझुकी लाउंजचे उद्घाटन ‘एसएमआयपीएल’च्या विक्री पश्चात सेवा विभागातील सहाय्यक उपाध्यक्ष विवेक जैन आणि ‘एसएमआयपीएल’चे दैनंदिन कामकाज व्यवस्थापक ओसामू ताणी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी एसएमआयपीएल आणि रिद्धी सुझुकीचे अधिकारी देखील उपस्थित होते.