पंढरपूर, ठाणे, मुंबईमधील युवकांचा सहभाग ; विद्यार्थ्यांना महाविद्यालय प्रवेशासाठी आर्थिक मदत
‘तुमच्याकडे जमिनीचा सातबारा उतारा आहे का, तुम्ही भूमिहीन आहात का, तुमच्याकडे किती गाईगुरे आहेत, कुटुंबात किती व्यक्ती आहेत,’ अशा प्रकारच्या सरकारी चौकशींच्या फेऱ्यात दुष्काळग्रस्त भागातील रहिवाशांना न अडकवता, ‘घरात तीन वेळचे शिजवता येईल एवढे धान्य आहे का,’ असा एकच प्रश्न ‘सेव्ह इंडियन फार्मर्स’ या परदेशस्थ भारतीयांच्या ठाणे, मुंबई, पंढरपूर परिसरातील कार्यकर्त्यांकडून शेतकऱ्यांना विचारण्यात येतो. नकारात्मक उत्तर देणाऱ्या शेतकऱ्यांची तात्काळ यादी तयार करुन त्यांना किराणा धान्य देण्याची तयारी सुरू केली जाते. अशा प्रकारे सोलापूर, पंढरपूर, यवतमाळ भागातील दुर्गम खेडय़ांमधील ७० शेतकरी, मजुरांना एक महिनाभर पुरेल इतके किराणा साहित्य परदेशस्थ भारतीयांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी पुरविले आहे.
‘सेव्ह इंडियन फार्मर्स’(एस.आय.एफ.) या संस्थेचे महाराष्ट्रातील कार्यकर्ते आपला नोकरी, व्यवसाय सांभाळून दुष्काळग्रस्त भागातील दाह कमी करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. पंढरपूर तालुक्यातील गाडेगाव येथील यशवंतराव यादव हे ‘टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस’मध्ये पीएच. डी. करीत आहेत. सम्राट मित्रा, अभिजीत निकळे, ललिता मिश्रा हे मुंबई, ठाणे परिसरात राहतात. विविध आस्थापनांमध्ये ते नोकरी, व्यवसाय करीत आहेत. समाजमाध्यमांमधून दुष्काळावर सुरूअसलेल्या चर्चेतून ते ‘एस. आय. एफ.’ या परदेशस्थ भारतीयांच्या कार्याशी जोडले गेले आहेत. दुष्काळग्रस्तांसाठी लघु, मध्यम आणि दीर्घ मुदतीच्या जेवढय़ा सुविधा उपलब्ध करून देता येईल, तेवढय़ा सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न ही मंडळी ‘सेव्ह इंडियन फार्मर्स’च्या माध्यमातून करीत आहेत.
दुष्काळग्रस्त भागात सरकारकडून विविध प्रकारची मदत केली जाते. पण त्यामध्ये गावपातळीवर योग्य नियोजन होत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. या सगळ्या त्रुटी ओळखून ‘एस. आय. एफ’ने घराघरात जाऊन शेतकरी, मजुरांची खरी गरज काय आहे, हे ओळखून त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. पाण्याअभावी उभी पिके करपून गेली आहेत. मजुरीसाठी कामे नाहीत. पैसे मिळाले तरी खायचे काय, जनावरांना चारा कोठून आणायचा, असे अनेक प्रश्न दुष्काळग्रस्त भागातील काही शेतकऱ्यांसमोर आहेत. शेतकऱ्यांच्या गरजा ओळखून त्यांना त्या प्रमाणात ‘एसआयएफ’ कडून मदत करण्यात येत आहे.
सुरुवातीला २० कुटुंबाना दर महिन्याला किराणा धान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, ‘एसआयएफ’कडून मिळालेली मदत, कार्यकर्त्यांनी दाखविलेला दानशूरपणा, बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी उदारमनाने धान्याची केलेली मदत, या सगळ्या योग्य नियोजनामुळे पंढरपूर च्या दुष्काळग्रस्त भागातील ७० कुटुंबांना घरपोच एक महिन्याचे किराणा धान्य देण्यात कार्यकर्ते यशस्वी झाले आहेत. या मदतीत सातत्य ठेवण्यात येणार आहे, असे यशवंतराव यादव यांनी सांगितले.

मदतीसाठी आवाहन
ठाणे, मुंबई, कल्याण डोंबिवली परिसरातील अधिकाधिक दानशूर रहिवाशांनी दुष्काळग्रस्त भागात धान्य पुरवठा करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन या कार्यकर्त्यांनी केले आहे. दुष्काळग्रस्त भागात पाणी, धान्य, गुरांना चारा हा सरकारी मदतीचा ओघ सुरू असला तरी अनेक कुटुंबे या सगळ्या मदतीपासून वंचित राहत असल्याचे कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आले आहे. दैनंदिन उपजीविकेसाठी अनेक कुटुंबे तरसत आहेत, अशा कुटुंबांचे सर्वेक्षण करुन त्यांना तात्काळ मदतीचा हात पुढे केला जात आहे, असे सम्राट मित्रा, अभिजीत निकळे यांनी सांगितले.

Slum cleaning contract
झोपडपट्टी स्वच्छता कंत्राट : चौथ्यांदा मुदतवाढीची नामुष्की, १५ एप्रिलला न्यायालयात सुनावणी
BJPs Ghar Chalo Abhiyan Determined to reach twelve lakh voters in Pune
भाजपचे ‘घर चलो अभियान’! पुण्यातील बारा लाख मतदारांपर्यंत पोहोचण्याचा निर्धार
loksatta analysis 30 Indians promised high paying jobs in thailand duped into scams in laos
विश्लेषण: थायलंडमध्ये नोकरीचे आश्वासन… लाओसमध्ये बेकायदा रवानगी… ३० भारतीय तरुणांची कशी झाली सुटका?
Indian youth abroad
भारतीय तरुणांना परदेशात डांबून ठेवणाऱ्यांना अटक

‘एस.आय.एफ.’ म्हणजे काय
भारतात गेल्या दोन ते तीन वर्षांपासून पडणाऱ्या दुष्काळाच्या बातम्या नोकरी व्यवसायानिमित्त परदेशात स्थिरावलेले काही भारतीय तरुण वाचत होते. दुष्काळाचे भीषण वास्तव ऐकून अनेक तरुण अस्वस्थ होते. अशाच भारतीय तरुणांचा एक गट समाज माध्यमातून एकत्र आला. त्यांनी ‘सेव्ह इंडियन फार्मर्स’ (एस.आय.एफ.) हा गट स्थापन केला. या गटाच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त भागासाठी काही ठोस उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला. गेल्या दीड ते दोन वर्षांपासून ही मंडळी कार्यरत आहेत. देशाच्या विविध भागातील परदेशात नोकरी, व्यवसाय करीत असलेले भारतीय दुष्काळग्रस्तांसाठी सढळ हस्ते मदत करीत आहेत.

‘एसआयएफ’ची मदत
गाव परिसरात पाणीपुरवठय़ाच्या सोयी, अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांला शुल्क भरण्यासाठी १८ हजार रुपयांची मदत, पाण्याच्या टाक्या बसविणे, विधवा महिलांना म्हशी घेऊन दिल्याने त्या दुग्घव्यवसाय करतात. टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी अर्थसाहाय्य, जलतळी बांधून परिसरातील शेतकऱ्यांना भाजीपाला लागवडीसाठी साधन उपलब्ध करून देणे, अशी कामे संस्थेतर्फे दुष्काळग्रस्त भागात हाती घेण्यात आली आहेत, असे समन्वयक प्रमोद दलाल यांनी सांगितले.