साहित्य महागल्याने बांधकाम खर्चात २० टक्क्य़ांची वाढ

नीलेश पानमंद

ठाणे : करोनाकाळात गृह प्रकल्पातील घरांची विक्री थंडावल्यामुळे बिल्डरांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत असतानाच आता बांधकाम साहित्य महागल्यामुळे बांधकाम खर्चात १५ ते २० टक्क्य़ांनी वाढ झाली आहे. तसेच इंधन दरवाढीमुळे मालवाहतूक खर्चातही वाढ झाली आहे. याशिवाय करोनाकाळात गावी गेलेले अनेक कुशल आणि अकुशल कामगार पुन्हा परतले नसल्यामुळे कामगारांचा तुटवडा जाणवू लागला आहे. यामुळे बांधकाम क्षेत्राला महागाईचे चटके बसू लागल्याचे चित्र आहे.

गेल्या काही वर्षांपासून बांधकाम क्षेत्राला घरघर लागली आहे. नोटाबंदी, वस्तू आणि सेवा करापाठोपाठ आता वर्षभरापासून करोना काळामुळे बांधकाम व्यावसायिकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. करोनाकाळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर, अनेकांचे रोजगार बुडाले. त्याचा फटका गृह प्रकल्पातील घरांच्या खरेदी-विक्रीला बसला. राज्य शासनाने पहिली टाळेबंदी शिथिल केल्यानंतर बांधकाम क्षेत्राला उभारी देण्याचा प्रयत्न केला. मुद्रांक शुल्क कमी करण्याबरोबरच बांधकाम परवानगी शुल्कामध्येही सवलत देऊ केली. मुद्रांक शुल्क कमी केल्याने घरांची खरेदी-विक्री पुन्हा काही प्रमाणात सुरू झाली होती. यामुळे बांधकाम क्षेत्राला काहीसा दिलासा मिळाला होता. राज्य शासनाने ३१ मार्चपर्यंत मुद्रांक शुल्कावर सवलत देऊ केली होती. ही सवलत बंद झाल्यानंतर घरांची खरेदी-विक्री पुन्हा थंडावली आहे.

बांधकाम साहित्यांचे दर

साहित्य आधीचे दर  सध्याचे दर

स्टील   ३५ ते ४२ रुपये किलो ६२ ते ६८ रुपये किलो

अ‍ॅल्युमिनिअम   १८० रुपये किलो २४० रुपये किलो

सिमेंट   २६० ते ३२० रुपये गोणी  ३५० ते ४०० रुपये गोणी

मजुरीत वाढ

गेल्या वर्षी टाळेबंदी लागू झाल्यानंतर बांधकाम क्षेत्रात काम करणारे कुशल व अकुशल कामगार गावी निघून गेले. टाळेबंदीनंतर ६० टक्केच कामगार शहरात परतले. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात दुसऱ्यांदा टाळेबंदी लागण्याची चर्चा सुरू झाली. या चर्चेनंतर अनेक कामगारांनी पुन्हा गाव गाठले. दुसऱ्या टाळेबंदीचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर आता कामगार पुन्हा शहरात येऊ लागले असले तरी त्यांचे प्रमाण कमी आहे. सध्या शहरात ३० ते ३५ टक्के कामगार उपलब्ध असून त्यांनी मजुरीचे दर वाढविले आहेत. यापूर्वी कुशल कामगाराला ६०० रुपये तर, अकुशल कामगाराला २५० रुपये मजुरी दिली जात होती. आता कुशल कामगार १५०० तर, अकुशल कामगार ६०० रुपये मजुरी घेत आहे, अशी माहिती बांधकाम क्षेत्रातील सूत्रांनी दिली.

करोनाकाळामुळे गृहप्रकल्पातील घरांची खरेदी-विक्री ४५ टक्क्य़ांनी कमी झाली आहे. त्यातच बांधकाम साहित्य महागण्याबरोबरच इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्चातही वाढ झाली आहे. यामुळे बांधकाम खर्चात १५ ते २० टक्क्य़ांनी वाढ झाली आहे. कुशल आणि अकुशल कामगारांच्या तुटवडय़ामुळे त्यांचे दर वाढले आहेत. त्यामुळे बांधकाम क्षेत्र आर्थिक अडचणींचा सामना करीत आहे.

-जितेंद्र मेहता, पदाधिकारी, एमसीएचआय ठाणे</strong>