अंध आणि बहुविकलांग मुलांचे संगोपन हा त्यांच्या पालकांसाठी चिंतेचा आणि काळजीचा विषय असतो. प्रत्येक जण आपापल्या परीने अशा मुलांची काळजी घेत असतात. या विशेष मुलांना प्रशिक्षण देणाऱ्या संस्था, शाळा असल्या तरी १८ वर्षांनंतर त्या व्यवस्थेची दारे मुलांसाठी बंद होतात. त्यानंतर या मुलांना कुठे रमवावे, असा प्रश्न पालकांना सतावत असतो. तेव्हा एकटय़ाने ही समस्या सोडविण्यापेक्षा सामूहिक सहकाराने त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न ठाणे परिसरातील काही विशेष मुलांच्या पालकांनी केला. त्यातून ‘सोबती’ ही संस्था स्थापन झाली. या संस्थेच्या वाटचालीचा हा आढावा.. सोबती पालक संघटना, वाडा अंध आणि बहुविकलांग मुलांना साथ देणाऱ्या, मायेची नाती जपणाऱ्या सोबती पालक संघटनेचा ११वा वर्धापन दिन रविवार, २१ जानेवारी रोजी वाडा तालुक्यातील तिळसे येथील व्यवसाय प्रशिक्षण केंद्रात पार पडला. अंध आणि बहुविकलांग मुलांच्या पुनर्वसनासाठी २००४ मध्ये ११ पालक एकत्र आले. मुलांसाठी सक्षम पुनर्वसन केंद्र उभारायचे असेल, तर स्वत:हून पुढाकार घ्यायला हवा, याबाबतीत त्यांच्यात एकमत होते. सुरुवातीला त्यांना ठाण्यातील एका विश्वस्त संस्थेने जागा दिली आणि २१ जानेवारी २००७ रोजी ‘नॅब’ संस्थेने उपलब्ध करून दिलेली एक शिक्षिका आणि पाच-सहा मुलांसह ‘सोबती व्यवसाय प्रशिक्षण केंद्रा’ची वाटचाल सुरू झाली. सुरुवातीला ठाण्यात आणि नंतर अंधेरीला हे व्यवसाय प्रशिक्षण केंद्र भरत होते. आता वाडा तालुक्यातील तिळसे येथील संस्थेच्या प्रशस्त इमारतीत व्यवसाय प्रशिक्षण केंद्राचे कामकाज चालते. मुलांचा येथील दिनक्रम वैशिष्टय़पूर्ण असतो. त्यात निरनिराळे व्यायाम प्रकार, योगसाधना, दागिने बनवणे आदी उपक्रम राबविले जातात. निरनिराळ्या माळा, तोरणे, राख्या मुले बनवतात. सोमवार ते शुक्रवार ही मुले या व्यवसाय प्रशिक्षण केंद्रात असतात. शनिवार-रविवार मुले घरी येतात. मुले कामात असल्याने त्यांचे मन रमते. तसेच त्यामुळे त्यांची एकाग्रता वाढण्यास मदत होते. शिवाय अशा प्रकारच्या कामातून त्यांना काही प्रमाणात का होईना स्वावलंबी बनविणे हा ‘सोबती’ परिवाराचा उद्देश आहे. अनेकदा या अंध आणि बहुविकलांग मुलांविषयी समाजात आत्मीयता नसल्याचे जाणवते. काही ठिकाणी अशा मुलांना व्रात्य मुलांच्या चिडवाचिडवीलाही सामोरे जावे लागते. त्यामुळे ही मुले निराश होतात. अशा वेळी या मुलांना पालकांचा आधार महत्त्वाचा ठरतो. या मुलांना सतत आधाराची गरज भासू नये. त्यांना कामाची सुरुवात करून देऊन स्वावलंबी बनवणे हे काम ‘सोबती’ गेली अनेक वर्षे करीत आहे. वाडय़ातील प्रशिक्षण केंद्रामुळे अशा प्रकारचे उपक्रम मोठय़ा प्रमाणात राबविणे शक्य झाल्याचे संस्थेच्या प्रा. उषा बाळ यांनी सांगितले. तिळसे येथील प्रशिक्षण केंद्राची वास्तू भव्य आहे. त्यामुळे त्या वास्तूचा उपयोग संस्थेतील विशेष मुलांप्रमाणेच स्थानिक परिसरातील अशा मुलांना व्हावा, यासाठी ‘सोबती' प्रयत्नशील आहे. वाडा तालुक्यातील अंध आणि बहुविकलांग मुला-मुलींसाठी सोमवार ते शुक्रवार काही तासांसाठी विनामूल्य प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे. वाडा परिसरातील अशा मुलांच्या पालकांनी सोमवार ते शुक्रवार तिळसा येथील प्रशिक्षण केंद्रात संपर्क साधावा, असे आवाहन प्रा. उषा बाळ यांनी केले आहे. रविवारी वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास ‘रिहॅबिटेशन इंडिया’ संस्थेचे समीर घोष, तसेच लेखक मिलिंद बोकील उपस्थित होते. या दोघांची मुलाखत निळू दामले यांनी घेतली. विशेष मुलामुलींचे आदर्श पुनर्वसन करणारी व्यवस्था निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे संस्थेचे प्रकाश बाळ यांनी यानिमित्ताने सांगितले. संपर्क- ९७६९९४६८३८.