वसई अर्नाळा फार प्राचीन क्षेत्र! थेट पांडवकालापासून या क्षेत्राचा उल्लेख सापडतो. सांदिपनी ऋषींचा आश्रम असो वा परशुरामांची तपोभूमी, बौद्धकालीन स्तूप असो, वा शूर्पारक बंदर.. या अशा अनेक विभूतींच्या वास्तव्याने ही भूमी पावन झालेली आहे. अनेक राजवटी इथे नांदल्या आणि काळाच्या उदरात लोपदेखील पावल्या. या बेटाचे महत्त्व ओळखून परकीय सत्तांनी व्यापाराच्या दृष्टीने या भागाचे महत्त्व ओळखले आणि स्थानिकांवर शासनही केले. अन्यायाची परिसीमा झाली तेव्हा त्याचे निर्दालन करायला या भूमीचे सुपुत्र सरसावले. परकीयांच्या जोखडातून त्यांनी या भूमीला मुक्त केले. त्यांच्या या पराक्रमाची गाथा, शौर्य, मुत्सद्देगिरी, दूरदृष्टी, नेतृत्वकौशल्य आणि संघभावना अशा अनेक बोलक्या खुणाचे प्रतीक म्हणजे अर्नाळ्याचा हा किल्ला. काळाच्या ओघात बखरी आणि ऐतिहासिक पत्रव्यवहारातून इतिहासाच्या या पाऊलखुणा नष्ट झाल्या खऱ्या; परंतु काळाला टक्कर देत शतकानुशतके ताठ उभ्या असलेल्या इतिहासाच्या या मूक साक्षीदारांच्या उदरात आजही अनेक रहस्ये साठवून ठेवलेली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

समुद्राच्या लाटांचे आक्रमण आणि देह खिळखिळा करू पाहणाऱ्या दमट हवेशी दोन हात करत भक्कमपणे पाय रोवून उभी असलेली वास्तू म्हणजे जंजिरे अर्नाळाचा किल्ला! चहुबाजूंनी पाण्याने वेढलेल्या या बेटाकडे त्या काळी कोणाचे फारसे कधी लक्ष गेले नव्हते. त्या काळी व्यापाराच्या अनुषंगाने भारतात आलेल्या पोर्तुगीजांनी या ठिकाणी फक्त एक टेहळणी बुरुज बांधला होता; परंतु पोर्तुगीज गेल्यावर मात्र या बेटाचे व्यापारी आणि राजकीयदृष्टय़ा महत्त्व अधिक वाढले. कारण समुद्राला मिळणाऱ्या वैतरणा नदीमुळे समुद्र आणि नदी अशी दोन्ही मार्गे होणारा व्यापार लक्षात घेता महसूल मिळवण्यासाठी मराठय़ांनी जंजिरा हा किल्ला बांधला. किल्ल्याच्या उत्तराभिमुख असलेल्या प्रमुख प्रवेशद्वारावर बाजीराव अमात्य यांच्या आज्ञेवरून या किल्ल्याचं बांधकाम केल्याचा स्पष्ट उल्लेख असणारा शिलालेख आजही आढळतो. याशिवाय प्रवेशद्वारावर शरभ अथवा व्याल अशा अनेक प्राण्यांच्या रूपवैशिष्टय़ांपासून बनलेल्या प्राण्याचे तसेच विजयमाला धारण केलेल्या गजांचे सुस्थितीतील शिल्प आहे. किल्ल्यात प्रवेश केल्यावर गोल घुमट आढळतो. बुरुजाखाली सैनिकांना विश्रांती घेण्यासाठी कक्ष आहेत. किल्ल्याच्या संरक्षणासाठी बुरुजांवर केलेली वैशिष्टय़पूर्ण रचना बघण्यासारखी आहे. किल्ल्याच्या विविध दिशांना असलेले नऊ  बुरूज परिसराचे चौफेर दर्शन घडवतात. किल्ल्याबाहेर मराठय़ांनी बनवलेली मराठी धाटणीची एक तोफ अजूनही आहे. कालिकामातेच्या मंदिरासोबतच किल्ल्यात शंकराचे आणि दत्ताचे मंदिर असून एक दर्गादेखील आहे. अखेरच्या दीडशे सैनिकांसह उपाशीपोटी किल्ला लढवत ठेवणाऱ्या एकनिष्ठ बेलोसे यांची वीरगळदेखील येणाऱ्याचे लक्ष वेधून घेते. किल्ल्यापासून अंदाजे पाऊण तासावर पोर्तुगीजांनी बांधलेला बुरूज आहे. तिथे मूळ अर्नाळा किल्ल्यावरची वेताळ मूर्ती स्थलांतरित केलेली आहे. किल्ल्यात पिण्याच्या पाणी साठवण्याची व्यवस्था आणि गोड पाण्यांच्या विहिरीसुद्धा आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Information on janjira and arnala fort
First published on: 13-04-2017 at 01:14 IST