कल्याण- कल्याण डोंबिवली शहर परिसरात अधिकाधिक नागरिकांनी शरीर सुदृढतेसाठी सायकलचा वापर करावा. जे नियमित सायकलचा वापर करत असतील त्यांना प्रोत्साहन द्यावे. सायकल एक चळवळ बनवून या माध्यमातून कल्याण, डोंबिवली शहरे प्रदुषण मुक्त करावीत, या विचारातून या दोन्ही शहरांमधील सायकल क्लबच्या सदस्यांबरोबर सोमवारी पालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी एक बैठक घेतली. इंधनाच्या भडकलेल्या किमती, वाढते प्रदुषण याचा विचार करून सायकलचा शहरात अधिक वापर व्हावा यादृष्टीने पालिका प्रशासनाने सहकार्य करावे, अशी मागणी सायकल क्लबच्या सदस्यांनी केली.

सायकलचा वापर अधिक वाढवायचा असेल तर वाहतुकीचे नियम, सायकल स्वार, रस्ते सुरक्षितता हे विषय महत्वाचे असल्याने कल्याण वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे, डोंबिवली वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते, अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, कार्यकारी अभियंता आणि कल्याण सायकल क्लबचे सदस्य प्रशांत भागवत, डोंबिवली सायकल क्लबचे डॉ.सुनील पुणतांबेकर, कल्याण सायकल क्लबचे अव्दैत जाधव, हिरकणी क्लबच्या सुरेखा गटकल, किरण गोरे उपस्थित होते.

अनेक वर्षापासून दूध, वृत्तपत्र विक्रेते, दुकानदार सायकलवरून आपले व्यवहार करतात. अनेक शाळकरी मुले सायकलवरून शाळेत येतात. इंधनाचे वाढते दर, इंधनामुळे होणारे प्रदूषण विचारात घेऊन डोंबिवली, कल्याणमधील अनेक पर्यावरणप्रेमी कार्पोरेट, उद्योजक, व्यावसायिक, उच्चपदस्थ नोकरदार, निवृत्त अधिकारी सायकलचा वापर करतात. दोन्ही शहरांमध्ये १२ हून अधिक सायकल क्लब आहेत. महिलांचे स्वतंत्र सायकल क्लब आहेत, अशी माहिती सायकल क्लब पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांना दिली.

वाहन संख्या वाढली आहे. अंतर्गत रस्ते वाहतुकीवर सायकलाचा रहिवाशांनी अधिक वापर केला तर शहरांतर्गत वाहतुकीमधील वाहनांची संख्या कमी होईल. प्रदुषण कमी होण्यास मदत होईल. माझे शहर सुदृढ शहर ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सायकल शीर्षस्थानी ठेऊन जागृती करण्याचे एक प्रभावी माध्यम आहे, असे आयुक्त सूर्यवंशी यांनी सांगितले.

सायकल क्लबच्या मागण्या

पालिका हद्दीतील नऊ रेल्वे स्थानक परिसरात वाहनतळांवर २५ टक्के आरक्षण सायकलसाठी ठेवण्यात यावे. अनेक नोकरदार घरापासून रेल्वे स्थानकात येण्यासाठी सायकलचा वापर करतात. सायकल ठेवण्यासाठी जागा नसल्याने ते गल्लीतील रस्ते, झाडाचा आडोसा घेऊन सायकल ठेवतात. मुख्य वर्दळीच्या ९० फुटी रस्त्यांवर सायकलसाठी स्वतंत्र मार्गीका असावी. सायकलवरून व्यवसाय करणाऱ्यांचा पालिकेने सन्मान करावा. सायकल संमेलन, शहरातील मान्यवरांना सायकल फेरीत सहभागी करून घ्यावे. सायकलचा वापर वाढावा यासाठी शाळांमध्ये जागृती अभियान राबवावे. अनेक महिला नियमित सायकलचा वापर करतात. महिला सायकल क्लबच्या माध्यमातून उपक्रम घ्यावेत. स्मार्ट, ई सायकलचा वापर सुरू आहे. तो अधिक प्रभावीपणे अंमलता येईल यादृष्टीने पालिकेने सहकार्य करावे, अशा मागण्या सायकल क्लब सदस्यांनी आयुक्तांकडे केल्या.

आयुक्तांचे आश्वासन

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत सायकलचा प्रभावी वापर होईल यासाठी प्रशासन कटिबध्द आहे. ठरावीक रस्त्यांची निवड करून तेथे सायकल मार्गिका करणे, सरावासाठी सायकल मैदान उभारणे, शाळांमध्ये सायकल वापराचा जागर करणे. पथदर्शी प्रकल्प म्हणून हे उपक्रम सायकल क्लब माध्यमातून पालिकेकडून हाती घेतले जातील – डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त