ठाणे : संजय गांधी राष्ट्रीय उद्यान क्षेत्रातील वागळे इस्टेट येथील इंदिरानगर भागात चार ते पाच वर्षांच्या जखमी नर बिबट्याला पकडण्यास वन विभागाला यश आले आहे. बिबट्याच्या चारही पंजांच्या तळव्यावर आणि मागील पायावर जखम झाल्याचे आढळून आले आहे. तसेच त्याच्या शरीरावर आणि शेवटीवर व्रण आढळले आहेत. ही जखम बिबट्याची इतर हिंस्त्र प्राण्यासोबत झालेल्या झुंजीमुळे झाली असावी असा अंदाज वन विभागाला आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीतील इंदिरानगर भागात वन कर्मचारी आणि राज्य सुरक्षा मंडळाच्या जवानांना शनिवारी सायंकाळी झाडावर जखमी बिबट्या पथकाला आढळून आला होता.
याबाबतची माहिती अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच डब्यूडब्यूए आणि राॅ या प्राणीप्रेमी संघटनेचे स्वयंसेवक घटनास्थळी पाहणीसाठी गेले. त्यांनी बिबट्याचे निरीक्षण केले असता, त्याच्या हालचाली व्यवस्थित नसल्याचे आढळले. तसेच, रात्रीची वेळ असल्याने बिबट्याला पकडणे शक्य नव्हते.
रविवारी सकाळी ६ वाजता पथकाने पुन्हा शोधमोहीम सुरु केली. त्यावेळी बिबट्या रात्रीच्या ठिकाणापासून ७० ते ८० मीटर अंतरावर झाडीत पडल्याचे दिसले. बिबट्या जखमी आणि अशक्त असल्याने त्यास जाळीने पकडणे शक्य नव्हते. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे पशुवैद्यकीय अधिकारी विनया जंगले यांच्यासह बचाव पथकाने डार्ट मारुन बिबट्याला बेशुद्ध केले. त्यानंतर त्याला पकडले. ही कारवाई संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वन संरक्षक व संचालक अनिता पाटील, उप संचालक प्रदीप पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी विनया जंगले, येऊरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मयुर सुरवसे, ठाणे वन परिक्षेत्र अधिकारी नरेंद्र मुठे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे जलद बचाव गट, रोहीत मोहिते आणि डब्यूडब्यूए संस्था, राॅ संस्थेच्या स्वयंसेवकांनी यशस्वी पार पाडली.
बिबट्या जखमी
बिबट्याची प्राथमिक तपासणी आणि उपचार करुन त्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट बचाव केंद्रात नेण्यात आले. बिबट्याच्या चारही पंजांच्या तळव्यावर जखमा आढळून आल्या. तर मागील बाजूच्या पायास मोठी जखम होती. त्यांच्या शरीरावर आणि शेपटीवर व्रण होते. झुंजीमध्ये तो जखमी झाला असावा असा अंदाज आहे.
शनिवारी रात्री बिबट्या दिसल्याने इंदिरानगर भागातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण होते. बिबट्याला पकडल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
