कल्याण- कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील धोकादायक इमारती पाडताना प्रभागांमधील साहाय्यक आयुक्त विकासकांच्या सोयीची बाजू घेऊन भाडेकरुंवर अन्याय करत आहेत. साहाय्यक आयुक्तांच्या विकासक धार्जिण्य भूमिकेमुळे धोकादायक इमारतींमध्ये वर्षानुवर्ष राहणारे अनेक भाडेकरु मूळ जमीन मालक, विकासक भोगवट्याचा हक्क देत नाही म्हणून बेघर झाले आहेत. अशा भाडेकरुंचा प्रश्न धोरणात्मक निर्णय घेऊन प्राधान्याने मार्गी लावावा, अशी मागणी शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनी आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांची सोमवारी भेट घेऊन केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रस्ते, खड्डे, दुर्लक्षित ग्रंथालय प्रश्न, दिवंगत प्रकाश परांजपे प्रशासकीय मार्गदर्शक केंद्र अशा नागरी विषयांवर जिल्हाध्यक्ष थरवळ यांनी आयुक्तांची पालिका मुख्यालयात भेट घेतली. आयुक्तांनी हे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. महानगर महिला संघटक वैशाली दरेकर, शहरप्रमुख विवेक खामकर, विधानसभा संघटक तात्यासाहेब माने, महिला शहर संघटक मंगला सुळे, उपशहरप्रमुख अरविंद बिरमोळे यावेळी उपस्थित होते. धोकादायक इमारतीत ४० वर्षापासून रहिवासी भाडेकरू म्हणून राहतात. अशा इमारतींचा पुनर्विकास करताना विकासक भाडेकरूंना बळजबरीने जागा खाली करण्याचा आग्रह करतात. भाडेकरू आपणास या जागेवर आपला हक्क राहिल असे लेखी द्या अशी विकासक, पालिका अधिकाऱ्यांकडे मागणी करतात. ही मागणी विकासकांकडून पूर्ण केली जात नाही. एक दिवस प्रभाग साहाय्यक आयुक्त धोकादायक इमारतीमधील भाडेकरूंना धाकदपटशा दाखवून, विकासकांची बाजू घेऊन घरे खाली करुन घेतात. इमारत तोडण्यापूर्वी साहाय्यक आयुक्तांनी भाडेकरूंना त्यांचे भोगवट्याचे हक्क मिळवून देण्यासाठी, पुनर्विकास होईपर्यंत त्यांना योग्य भाडे मिळून दिले तर भाडेकरूंवर बेघर होण्याची वेळ येणार नाही. अलीकडे साहाय्यक आयुक्त घाईने धोकादायक इमारती जमिनदोस्त करुन भाडेकरुंना बेघर करतात. अशा इमारती तोडण्यापूर्वी भाडेकरूंना त्यांचे लाभाचे हक्क मिळतील असे धोरण जाहीर करावे, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. डोंबिवलीतील फ प्रभागातील एक कामगार धोकादायक इमारती विकासकांनी आमच्या यंत्रणेकडून पाडाव्या म्हणून मध्यस्थी करत असल्याची माहिती एका विकासकाने दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Injustice demolishing dangerous buildings complaint shiv sena sadanand tharwal commissioner ysh
First published on: 08-08-2022 at 17:10 IST