मनसेचा गंभीर आरोप; बीएसयूपीमधील घरांचा बेकायदा ताबा प्रकरण

ठाणे : शहरात बीएसयूपी योजनेच्या माध्यमातून आखण्यात आलेल्या योजनेचे तीन तेरा वाजले असतानाच या योजनेतील सदनिकांमध्ये बेकायदा बिऱ्हाड थाटणाऱ्या बोगस सदनिकाधारकांचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले आहे. या प्रकरणी पालिकेने चौकशी समिती नेमली असली तरी या समितीचा कारभारही वादात सापडण्याची चिन्हे आहेत. या समितीमधील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या तसेच चौकशीच्या कार्यपद्धतीविषयी असलेली साशंकता लक्षात घेता चौकशीचा फार्स उभा केला जात असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी या प्रकरणी तक्रार दाखल करत चौकशीची मागणी केली होती. महापालिकेने या तक्रारीच्या आधारे चौकशी समिती नेमण्याचे सोपस्कार पूर्ण केले खरे, प्रत्यक्षात मात्र चौकशी अजूनही सुरुच झालेली नाही, असा आरोप मनसेने केला आहे. या प्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार देण्यात आली असून त्यात दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

ठाणे येथील धर्मवीरनगर येथे २०१३ साली महापालिकेने बीएसयूपी योजनेच्या माध्यमातून आनंदकृपा या इमारतीचे बांधकाम केले. इमारत क्रमांक २३ मध्ये रहिवाशांना सदनिकांचे वाटप करण्यात आले होते. सदनिकांचे वाटप केल्यानंतर इमारतींमधील ६०३, ८०२, ८०४, ८०५ व ८०७ या क्रमांकाच्या सदनिका शिल्लक राहिल्या होत्या. या सदनिकांचा काही नागरिकांनी बेकायदा ताबा घेतला होता. याबाबत इमारतीतील रहिवाशांनी पालिका प्रशासनाकडे तक्रार केली होती. महापालिकेने मात्र पुढे काहीच कारवाई केली नव्हती.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागाध्यक्ष संदीप पाचंगे यांच्याकडे याबाबत तक्रार येताच त्यांनी रहिवाशांच्या शिष्टमंडळासह पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांची भेट घेतली. माळवी यांनी प्रशासनाला कारवाईचे आदेश दिल्यानंतर संबंधित इमारतीमध्ये अनधिकृतरीत्या राहणाऱ्या रहिवाशांच्या घरांचा पंचनामा करण्यात आला होता. त्याचबरोबर अनधिकृत पद्धतीने राहणाऱ्या भाडेकरूंना बाहेरचा रस्ता दाखवत काही घरे रिकामी करण्यात आली. हा विषय गंभीर असल्याचे स्पष्ट करत पाचंगे यांनी आयुक्तांची भेट घेतली आणि या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार ठाणे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करण्यात आली होती. त्यात उपायुक्त, उपनगर अभियंता, कार्यकारी अभियंता दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता. ही समिती गठित होऊन दोन महिन्यांचा काळ लोटला तरी समितीने अद्यापही चौकशी केलेली नसल्याची तक्रार पाचंगे यांनी नोंदवली आहे.

या चौकशीनंतर पालिका अधिकाऱ्यांचीच नावे घोटाळ्यात पुढे येण्याची शक्यता आहे. बोगस ताबाधारक बीएसयूपीच नव्हे तर महापालिकेच्या इतर प्रकल्पामध्येही घुसविण्यात आले आहेत. मध्यंतरी महापालिकेने मोठय़ा प्रमाणावर रस्ते रुंदीकरण मोहीम हाती घेतली होती. या वेळी राबविण्यात आलेल्या पुर्नवसन प्रकल्पातील गाळे तसेच घरांचे वाटपही वादग्रस्त पद्धतीने झाल्याच्या तक्रारी पुढे येत आहे. या प्रक्रियेत तरबेज असलेल्या एका अधिकाऱ्याने बीएसयुपी प्रकल्पातही बराच गोंधळ घातला असल्याचा संशय आहे. अशा अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी चौकशी समितीचे कामकाज सुरू केले जात नाही, असा आरोप पाचंगे यांनी केला आहे. या प्रकरणी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांच्याशी संपर्क करूनही त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

कुंपणानेच खाल्ले शेत

ठाणे पालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून खोटी कागदपत्रे तयार करत काही दलाल या प्रकल्पातील घरांची खरेदी, विक्री करत आहेत. काही घरे भाडयाने देऊन दरमहा पैसे कमविण्याचा धंदा अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने त्यांनी थाटला आहे. तक्रारीनंतर बेकायदा पद्धतीने राहणाऱ्या रहिवाशांना घरे खाली करण्यास पालिकेने भाग पाडले. परंतु या रहिवाशांनी ८ वर्षे ज्यांना भाडे दिले, त्यांची माहिती पुराव्यासह देऊनही समितीकडून कारवाई करण्यास टाळाटाळ होत आहे. त्यामुळे कुंपणानेच शेत खाल्ल्याचा हा प्रकार असल्याचा आरोप मनसेने केला आहे.