डोंबिवलीतील पर्जन्य जलसंचय प्रकल्पांची तपासणी

भूजलाची घटणारी पातळी, जल संवर्धनासाठी शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना दिलेल्या आदेशांचा विचार करून कल्याण-डोंबिवली महापालिकेने शहरातील वसाहतींमधील पर्जन्य जलसंचय (रेन वॉटर हाव्‍‌र्हेिस्टग) योजनांची नव्याने तपासणी सुरू केली आहे.

नव्या प्रकल्पांसाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेची चाचपणी

भगवान मंडलिक

कल्याण : भूजलाची घटणारी पातळी, जल संवर्धनासाठी शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना दिलेल्या आदेशांचा विचार करून कल्याण-डोंबिवली महापालिकेने शहरातील वसाहतींमधील पर्जन्य जलसंचय (रेन वॉटर हाव्‍‌र्हेिस्टग) योजनांची नव्याने तपासणी सुरू केली आहे. या योजना सुरू आहेत का, सोसायटीचालकांच्या अडचणी आणि या योजना पूर्ण क्षमतेने सुरू राहाव्यात यासाठी प्रशासन स्तरावरून करावयाचे प्रयत्न याचा सविस्तर अहवाल पाणीपुरवठा विभागाने द्यावा, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार वसाहतींमधील जुने आणि कार्यान्वित नसलेले प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठी अभियंता विभागाने कंबर कसली आहे.

पालिका हद्दीत नवीन इमारतीला बांधकाम परवानगी देताना सौर ऊर्जा प्रकल्प, पर्जन्य जलसंचय योजना सोसायटी आवारात उभारण्याची अट नगररचना विभागाकडून विकासकाला टाकली जाते. विकासकाने हे प्रकल्प उभारले की त्याची अंमलबजाणी सोसायटी पदाधिकारी करतात. सौर ऊर्जा योजनेतून सोसायटीला गरम पाणी मिळते. पर्जन्य जलसंचय योजनेतून पावसाचे इमारतीच्या गच्चीवर पडणारे पाणी वाहून न जाता इमारतीच्या तळाला जलकुंभांमध्ये  जमा होते. अनेक वेळा विकासकाने हे प्रकल्प उभारून दिले की सोसायटी चालक या प्रकल्पांच्या देखभालीकडे लक्ष देत नाहीत. पुढे हे प्रकल्प बंद पडतात.

पर्यावरण संवर्धन, वीजबचत, पाणीबचतीत भर घालणाऱ्या या महत्त्वाच्या प्रकल्पांची योग्यरीतीने अंमलबजावणी होत नसल्याने आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पालिका हद्दीतील पर्जन्य जलसंचय योजनांची पाहणी करण्याचे आदेश पाणीपुरवठा विभागाला दिले आहेत. २०१६ पासून ज्या सोसायटय़ांना पर्जन्य जलसंचय योजना उभारणीसाठी दाखले दिले अशा सोसायटीतील या योजनांची तपासणी सुरू केली आहे. हे प्रकल्प बंद असतील तर त्याची दुरुस्ती करून ते तातडीने सुरू करून घ्यावेत. पाण्याचे महत्त्व आणि भूजल पातळी वाढीसाठी हे प्रकल्प किती महत्त्वाचे हे सोसायटी चालकांना पटवून देण्यात येणार आहे.  यासाठी सोसायटी चालकांची मार्गदर्शन शिबिरे घेण्यात येणार आहेत, असे कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे यांनी सांगितले.

  • २०१६पासून शहरातील एकूण पर्जन्य जलसंचय योजना : ६२५
  • कल्याण विभागातील योजना :  ३८९
  • डोंबिवली विभागातील योजना : २३६

२०१९ पासून जलसंचय योजना उभारणीत घट

दैनंदिन वापरासाठी पर्जन्य जलसंचय योजनेतील पाण्याचा वापर व्हावा. भूजल पातळी वाढून जैवविविधता वाढावी. या विचारातून पर्जन्य जलसंचय योजना पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्यासाठी सोसायटी चालकांनी प्रयत्न करावेत. यासाठी शहर आयुक्तांच्या सूचनेवरून ही तपासणी मोहीम सुरू केली आहे.

– प्रमोद मोरे, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Inspection rainwater harvesting projects dombivli ysh

Next Story
गुन्हेवृत्त : जिल्ह्यत दुचाकी चोरांचा उच्छाद
ताज्या बातम्या