ठाणे: कोपरी पूलाच्या तुळई बसविण्याचे काम पूर्ण; आता पुन्हा वाहतूक बदलाची आवश्यकता नाही | Installation of kopri bridge beams completed thane amy 95 | Loksatta

ठाणे: कोपरी पूलाच्या तुळई बसविण्याचे काम पूर्ण; आता पुन्हा वाहतूक बदलाची आवश्यकता नाही

मुंबई आणि ठाणे शहराच्या वेशीवर असलेल्या कोपरी रेल्वे पूलावर शेकडो टन वजनाची लोखंडी तुळई (गर्डर) बसविण्याचे काम सोमवारी सकाळी ६ वाजता पूर्ण झाले.

ठाणे: कोपरी पूलाच्या तुळई बसविण्याचे काम पूर्ण; आता पुन्हा वाहतूक बदलाची आवश्यकता नाही
कोपरी पूलाच्या तुळई बसविण्याचे काम पूर्ण

मुंबई आणि ठाणे शहराच्या वेशीवर असलेल्या कोपरी रेल्वे पूलावर शेकडो टन वजनाची लोखंडी तुळई (गर्डर) बसविण्याचे काम सोमवारी सकाळी ६ वाजता पूर्ण झाले. सर्व तुळई बसवून झाल्याने भविष्यात कोपरी पूलाच्या निर्माणाच्या कामासाठी पुन्हा वाहतूक बदलाची आवश्यकता लागणार नाही. त्यामुळे कोपरी रेल्वे पूल निर्माणामुळे लागू करण्यात येणाऱ्या वाहतूक बदलाच्या त्रासातून ठाणे-मुंबईकरांची सुटका होणार असून त्याचबरोबर हा पुल वाहतूकीसाठी लवकरच खुला होणार असल्याने ठाणे-मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा >>>बेकायदा बांधकामाप्रकरणी ‘ईडी’ने वास्तुविशारद संदीप पाटील यांच्याकडून घेतली माहिती; अनेकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

मुंबई आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोपरी रेल्वे पूल हा वाहतूकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या मार्गावरून दररोज हजारो हलकी तसेच अवजड वाहनांची वाहतूक ठाणे, नाशिक, भिवंडी, कल्याण आणि मुंबईच्या दिशेने होत असते. हा पुल अरुंद असल्यामुळे याठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. ही समस्या सोडविण्यासाठी या पूलाच्या रुंदीकरणाचे काम मध्य रेल्वे प्रशासन आणि एमएमआरडीएकडून सुरू आहे. यातील पहिल्या टप्प्यातील काम म्हणजेच, ठाण्याहून मुंबईत जाण्यासाठी आणि मुंबईहून ठाण्यात येण्यासाठी दोन नव्या मार्गिका तयार करून पूर्ण झाल्या आहेत. या पूलावरून वाहतूक सुरू झाली आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील मुख्य पूलावरील मार्गिकांच्या निर्माणाचे काम सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून शनिवार ते सोमवार या दिवशी दररोज रात्री ११ ते सकाळी ६ यावेळत तुळई उभारणीचे काम मध्य रेल्वे आणि एमएमआरडीएकडून सुरू होते. या तीन दिवसांत मध्यरात्री कोपरी पूलावरील अतिरिक्त मार्गिकेवरील वाहतूक पूर्णपणे बंद करून ती पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती. त्यानंतर प्रशासनाने एकूण सात तुळई रेल्वे पूलावर बसविल्या.

हेही वाचा >>>केडीएमटी’च्या बस थांब्यांना रिक्षा, दुचाकी वाहनांचा विळखा; ‘केडीएमटी’चे वाहन चालक त्रस्त

प्रत्येकी ११० टन वजनाच्या या तुळई होत्या. यातील तीन तुळई एकमेकांना जोडलेल्या अवस्थेतील आहेत. तर उर्वरित एक तुळई ही एक अशापद्धतीने या सर्व तुळई सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत बसवून पूर्ण झाल्या आहेत. या सातही तुळई आता एकमेकांना जोडण्यासाठी लोखंडी पट्ट्या लावल्या जाणार आहेत. परंतु त्यासाठी वाहतूक बदलाची आवश्यकता नसल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले. तसेच भविष्यातही पुलाच्या निर्माण काळात वाहतूक बदल लागू नसतील, असे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले. त्यामुळे ठाणेकरांची कोपरी पूलाच्या निर्माण कार्यामुळे होणारी कोंडी आता टळणार आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-11-2022 at 15:48 IST
Next Story
कल्याण डोंबिवलीतील ५० पेक्षा जास्त ‘ईडी’च्या रडारवर, बेकायदा बांधकाम प्रकरणात चौकशी….